पिंपरी | निर्भीड सत्ता न्यूज
पिंपरी-चिंचवड शहरात योग्य दाबाने, पुरेसा प्रमाणात नियमितपणे पाणीपुरवठा करण्यासाठी आणि पाणीपुरवठा विभागाचे व्यवस्थापन सुरळीत करण्यासाठी शासनाच्या पाटबंधारे विभागाच्या स्वतंत्र अधिकार्यांची महापालिकेने नियुक्ती करावी. त्यामुळे नागरिकांच्या तक्रारी कमी होतील, असा सक्त सूचना महापौर उषा ढोरे व उपमहापौर तुषार हिंगे यांनी आयुक्त श्रावण हर्डीकर यांना सोमवारी (दि.12) केल्या.पाणीपुरवठ्यासंदर्भात तक्रारींबाबत आयोजित बैठकीत वरील सूचना करण्यात आल्या.
बैठकीस महापौर ढोरे, उपमहापौर हिंगे, सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके, स्थायी समिती अध्यक्ष संतोष लोंढे, विरोधी पक्षनेते राजू मिसाळ, माजी महापौर राहुल जाधव, क्षेत्रीय समिती अध्यक्ष हर्षल ढोरे, नगरसेविका उषा मुंढे, आयुक्त श्रावण हर्डीकर, पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख सहशहर अभियंता रामदास तांबे, कार्यकारी अभियंता प्रवीण लडकत व अधिकारी उपस्थित होते.
पवना धरण 100 टक्के भरलेले असताना आणि पावसाळा असताना शहरातील काही भागांत गढूळ व दूषित पाणीपुरवठा होत आहे. काही भागात कमी वेळ व अवेळी पाणीपुरवठा होत आहे. या बाबत नागरिकांच्या तक्रारी वाढल्या आहेत. या संदर्भात आयुक्तांसमवेत बैठकीचे आयोजन केले होते.
उपमहापौर तुषार हिंगे म्हणाले की, पाणी शुद्धीकरणासाठी पुणे महापालिकेप्रमाणे जर्मनच्या अद्ययावत स्वयंचलित तंत्रज्ञानाचा वापर करावा. दिवसाआड पाणीपुरवठा बंद करून तो दररोज करावा. पाईपातून अर्धा तास केवळ हवा येत असतानाही पाण्याचा मीटर पळतो. परिणामी, पाणी बिल अधिक येत आहे. गढूळ पाणी आल्याने नागरिकांना सुरूवातीला पाणी सोडून द्यावे लागते. पाणी पुरवठ्याचे नियोजन योग्य नाही. शुद्धीकरण यंत्रणेपासून पाणी वितरणासाठी एकच ठेकेदार का नेमला जातो. अनुभवी ठेकेदार का नेमले जात नाहीत. निविदा प्रक्रिया न काढता त्याला मुदतवाढ का दिली जात आहे. यासह विविध तक्रारी व समस्या उपमहापौर हिंगे तसेच, इतर पदाधिकार्यांनी उपस्थित केले.
आयुक्त श्रावण हर्डीकर व रामदास तांबे यांनी खुलासा केला. पुण्यापेक्षा आपली जलशुद्धीकरणाची पद्धत अत्याधुनिक आहे. गढूळ पाणीपुरवठा केला जात नाही. शुद्धीकरण करताना मोठ्या प्रमाणात गाळ जमा होत असल्याने त्यासाठी अधिक पाणी खर्च होत आहे. जोपर्यंत 30 एमएलडी अतिरिक्त पाणी उपलब्ध होत नाही. तोपर्यंत दररोज पाणीपुरवठा करता येणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.शहरातील सर्व टाक्याची अचानक पाहणी केली जाईल. ज्या टाकीत माती आढळून येईल. त्यावर कारवाई केली जाईल. तक्रारी सुधारण्याबाबत तातडीने उपाययोजना करण्याचा सूचना आयुक्तांनी पाणीपुरवठा विभागाच्या अधिकार्यांना केल्या. दळवीनगर, चक्रपाणी वसाहत, बिजलीनगर, सुदर्शननगर, प्रेमलोक पार्क या भागांतून पाण्याबाबत तक्रारींचे फोन मला येत आहेत, असे आयुक्तांनी सांगितले. बैठकीत उपमहापौरांनी उपस्थित केलेल्या 15 प्रश्नांची साचेबद्ध उत्तरे देण्यात आली.
पाणीपट्टी वाढीस विरोध
इतर शहराच्या तुलनेत पिंपरी-चिंचवड शहरातील पाणी दर खूपच अल्प आहे. तो वाढविण्याचा महापालिका प्रशासनाचा विचाराधीन आहे. त्यास पदाधिकार्यांनी सहमती द्यावी, असे आयुक्त हर्डीकर म्हणाले. त्यास बहुतांश पदाधिकार्यांनी विरोध केला. प्रथम योग्य प्रमाणात व स्वच्छ पाणी दररोज द्या. त्यानंतर दरवाढीचा विचार करा. अन्यथा आमचा विरोध कायम आहे, असे महापौर ढोरे व उपमहापौर हिंगे यांनी स्पष्ट केले.
- महापालिका सभेत प्रश्न उपस्थित करणार
उपमहापौरपाणीपुरवठा विभागाच्या अधिकार्यांनी ठरलेली उत्तरे दिली आहेत. त्यामुळे तक्रारींवर समाधानकारक उत्तरे मिळालेली नाही. त्यमुळे मूळ प्रश्न कायम आहे. महापालिका सर्वसाधारण सभेत प्रश्न मांडून पाणीपुरवठा विभागाचा भोंगळ कारभार उघड करणार आहे, असे उपमहापौर तुषार हिंगे यांनी सांगितले.