मुंबई | निर्भीडसत्ता न्यूज
शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेनेत फूट पडून ठाकरे आणि शिंदे असे दोन गट निर्माण झाले आहेत. त्यामुळे दोन्ही गटांमध्ये आरोप प्रत्यारोपाचे सत्र सुरूच असल्याचे दिसून येते. अशातच शिंदे गटाचे आमदार प्रकाश सुर्वे यांनी वादग्रस्त वक्तव्य केले आहे. त्यामुळे त्यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. त्यांनी समर्थकांसमोर ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांना इशारा देताना चिथावणीखोर भाषण केले. ते म्हणाले कुणी अरे केले तर तुम्ही का रे करून ठोकून काढा. हात तोडता नाही आला तर तंगडी तोडा. दुसऱ्या दिवशी मी टेबल जामीन करून देईल. असा वादग्रस्त इशारा त्यांनी ठाकरे गटाला दिला आहे. मुंबईतील मागठाणेमधील कोकणीपाडा इथे सामाजिक कार्यक्रमात सुर्वे यांनी हे वादग्रस्त विधान केले आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या समर्थकाच्या भाषणामुळे नवीन वाद निर्माण होण्याची चिन्ह दिसत आहेत. सुर्वे यांच्या या चिथावणीनंतर ठाकरे गटातील शिवसैनिक आक्रमक झालेत. अनेकांनी याला विरोधदेखील केला आहे. शिवसेनेच्या माजी नगरसेवकाने सुर्वे यांच्या वक्तव्याचा निषेध करत कायदा, सुव्यवस्था, लोकशाही संविधान यांचे धिंडवडे करणाऱ्या सुर्वे यांच्यावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी दहिसर पोलीस स्टेशनमध्ये शिवसेनेच्या शिष्टमंडळाने केली आहे.