- वीजदर वाढीपाठोपाठ नागरिकांना महापालिकेचा शॉक
पिंपरी । निर्भीडसत्ता न्यूज
पिंपरी-चिंचवड महापालिका कचरा संकलन उपयोगकर्ता शुल्काच्या नावाने घरटी दरमहा 60 रूपये शुल्क घेणार आहे. ती वर्षभराची रक्कम मिळकतकर बिलात समाविष्ट करण्यात आली आहे. मिळकतकर बिलात ती रक्कम दिसून येत आहे. ही रक्कम 1 एप्रिल 2023 पासून नसून मागील चार वर्षांपासून वसुल केली जाणार आहे. वीज दर वाढीपाठोपाठ नागरिकांना मोठा नवीन आर्थिक शॉक सहन करावा लागणार आहे.
केंद्र शासनाच्या पर्यावरण, वन व हवामान बदल मंत्रालयाच्या 8 एप्रिल 2016 च्या अधिसूनचेनुसार घनकचरा व्यवस्थापन नियम 2016 लागू करण्यात आला आहे. महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम, 1949 च्या अंतर्गत महापालिकांसाठी घनकचरा (व्यवस्थापन व हाताळणी), स्वच्छता व आरोग्य उपविधी 2019च्या अनुषंगाने शहरातील मिळकतधारकांकडून उपयोगकर्ता शुल्क वसूलीची प्रक्रिया लागू करण्यात आली आहे.
त्यामध्ये घरे, दुकाने व दवाखाने, शोरुम, गोदामे, उपाहारगृहे व हॉटेल, राहण्याची व जेवणाची व्यवस्था असणारी हॉटेल, रुग्णालये, शैक्षणिक संस्था वसतीगृहे, धार्मिक संस्था, शासकीय व निमशासकीय कार्यालये, विवाह कार्यालये व मनोरंजन सभागृहे, खरेदी केंद्रे आदी मिळकतीची वर्गवारीनुसार मासिक शुल्क आकारण्यात येणार आहे. हे शुल्क दरमहा 60 रूपयांपासून ते 2 हजार रूपये इतके आहे. मासिक शुल्काचे रूपांतर वार्षिक स्वरूपात केले आहे. मिळकतकराच्या बिलात ही रक्कम समाविष्ट कण्यात आली आहे. कर संकलन विभागाच्या ऑनलाइन बिलात ती रक्कम समाविष्ट केल्याचे दिसत आहे. तसेच ती रक्कम जोडून बिलांची छपाई करण्याची कारवाई सुरू करण्यात आली आहे. 1 एप्रिल 2019 पासून म्हणजे मागील चार वर्षांपासून उपयोगकर्ता शुल्काची वसुली केली जाणार आहे. चालू वर्षे आणि मागील एका वर्षांचे असे दोन वर्षांचे शुल्क एकाच वेळी वसुल केले जाणार आहे. हा मिळकतधारकांना हा नवीन आर्थिक शॉक आहे.
चालू 2023-24 आर्थिक वर्षांत सन 2019-20 आणि सन 2023-24 अशा दोन वर्षांतील उपयोगकर्ता शुल्क वसुल केले जाणार आहे. सन 2024-25 वर्षात सन 2020-21 आणि सन 2024-25 अशा दोन वर्षांचे शुल्क, सन 2025-26 वर्षांत सन 2021-22 आणि सन 2025-26 या दोन वर्षांचे शुल्क, सन 2026-27 वर्षांत सन 2022-23 आणि सन 2026-27 या दोन वर्षांचे शुल्क आकारले जाणार आहे. तर, सन 2027-28 पासून एका वर्षाचे शुल्क आकारले जाईल.