पिंपरी । निर्भीडसत्ता न्यूज
पिंपरी-चिंचवड महापालिकेत नोकरी भरतीनुसार विविध पदांसाठी कर्मचार्यांची भरती करण्यात येत आहेत. नुकत्याच झालेल्या भरतीमध्ये 213 लिपिक यांना रूजू करून घेण्यात येणार आहे. तर, लाड-पागे समितीच्या शिफारशीनुसार रूजू झालेल्या 65 कर्मचारी आहेत. त्या सर्वांना महापालिकेकडून प्रशासकीय कामकाजाचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. प्रशिक्षण पूर्ण करणार्या कर्मचार्यांना नेमणूक दिली जाणार आहे.
महापालिकेच्या वतीने गेल्या वर्षी एकूण 72 स्टार्फ नर्सची (परिचारिका) भरती करण्यात आली. त्यानंतर दुसर्या टप्प्यात विविध 15 पदांसाठी एकूण 387 जागांसाठी मे महिन्यात ऑनलाइन परीक्षा घेण्यात आली. त्यात उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची कागदपत्रे तपासण्याची प्रक्रिया सुरू आहे. ती पूर्ण झाल्यानंतर त्या उमेदवारांना आरक्षणानुसार महापालिकेत रूजू करून घेण्यात येणार आहे. त्यातील रूजू होणार्या 213 लिपिक आणि लाड-पागे समितीच्या शिफारशीनुसार रूजू झालेल्या 65 कर्मचार्यांना पुण्यातील कोथरूड येथील ऑल इंडिया इन्स्टिट्युट ऑफ लोकल सेल्फ गर्व्हमेंट (अखिल भारतीय स्थानिक स्वराज संस्था) प्रशिक्षण देण्यात येणार आहे. एकूण चार गटात हे प्रशिक्षण दिले जाणार आहे. प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर लिपिकांना रूजू करून घेण्यात येणार आहे.
तसेच, स्थापत्य अभियांत्रिकी, विद्युत व स्थापत्य विभागाचे कनिष्ठ अभियंता या तांत्रिक विभागातील कर्मचार्यांनाही रूजू होण्यापूर्वी प्रशिक्षण दिले जाणार आहे. आवश्यक त्या विभागात तसेच, क्षेत्रीय कार्यालयात नव्याने रूजू झालेले कर्मचारी नेमण्यात येणार आहेत.