पिंपरी | प्रतिनिधी| निर्भीडसत्ता न्यूज
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने मामुर्डी व सांगवडे येथे पवना नदीवर नव्याने पुल उभारण्यात येत आहे. त्याचा खर्च 15 कोटींवरून 50 कोटींवर पोहचला आहे. या वाढीव खर्चास आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी सर्वसाधारण सभेची सुधारीत प्रशासकीय मान्यता दिली आहे.
वाहतुक रहदारी सुरळीत व सुरक्षित व्हावी म्हणून या भागात पुल उभारण्याची अनेक वर्षांपासूनची जुनी मागणी आहे. त्यानुसार महापालिका मामुर्डी येथील स्मशानमूभीजवळ पवना नदीवर पुल बांधत आहे. त्या कामासाठी नुकताच सल्लागार नेमण्यात आला आहे. हा पुल जलसंपदा विभागाच्या मान्यतेने बांधण्यात येणार आहे. त्यासाठी महापालिकेच्या 2023-24 च्या अर्थसंकल्पात 15 कोटींच्या निधीची तरतूद करण्यास सर्वसाधारण सभेने 29 मार्च 2023 ला प्रशासकीय मान्यता देण्यात आली होती.
पुलासाठी जलसंपदा विभागाने राज्य शासनाच्या 3 मे 2018 च्या मार्गदर्शक सुचनाच्या (महसुल) परिपत्रकानुसार पुल बांधण्यात यावा. त्याचे काटेकारपणे पालन करावे, असे महापालिकेस कळविले आहे. त्या परिपत्रकानुसार पुलाची जोता पातळी लाल पुररेषेपेक्षा 1.50 मीटर उंचीवर असणे आवश्यक आहे. त्यानुसार सद्यस्थितीतील पुलाचे पातळीपेक्षा नियोजित पुलाची उंची वाढणार आहे. मामुर्डी बाजूकडील जोडरस्त्यासाठी सुधारीत विकास आराखड्यानुसार नदी समांतर रस्ता करण्याचे नियोजन आहे. जलसंपदा परिपत्रकानुसार उच्चतम पुररेषा गृहीत धरू नवीन पुल बांधण्याचे नियोजन महापालिकेने केले आहे.
त्यामुळे पुल उभारण्याच्या खर्च 15 कोटीवरून सन 2022-23 च्या चालू दरसुचीनुसार 50 कोटींवर जाणार आहे. सन 2023-24 च्या अर्थसंकल्पात विशेष योजना लेखाशिर्षात 50 कोटींच्या निधीची तरतुद करण्यास आयुक्त सिंह यांनी सर्वसाधारण सभेची सुधारीत प्रशासकीय मान्यता दिली आहे. त्यामुळे पुल उभारण्याचा निधीचा अडसर दूर झाला आहे.
पुल 90 मीटर लांबीचा
नव्या आराखड्यानुसार पवना नदीवरील मुख्य पुल 12 मीटर रूंदीचा 90 मीटर लांबीचा असणार आहे. त्यासाठी 16 कोटी 50 लाख खर्च आहे. मामुर्डीकडील 12 मीटरचा जोडरस्ता 300 मीटर लांब आहे. त्यासाठी 22 कोटी 50 लाख खर्च आहे. सांगवडेकडील 12 मीटरचा जोडरस्ता 130 मीटर लांब आहे. विद्युत दिव्याचे खांब बसविण्यासाठी 1 कोटीचा खर्च आहे. असा एकूण 50 कोटींचा खर्च अपेक्षित आहे.