पिंपरी । निर्भीडसत्ता न्यूज
प्रारूप मतदार यादी नुकतीच प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यात नव्या मतदारांची संख्या वाढली आहे. तर, मयत, दुबार, स्थलांतरीत यांची नावे मतदार यादीतून वगळण्यात आली आहेत. पुणे जिल्ह्यात सर्वांधिक 5 लाख 85 हजार 736 मतदार चिंचवड विधानसभा मतदार संघात आहेत. तर, पिंपरी-चिंचवड शहराची मतदार संख्या 14 लाख 76 हजार 423 झाली आहे.
केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार राज्यात विधानसभा मतदार संघानिहाय प्रारूप मतदार यादी जाहीर करण्यात आली आहे. प्रारूप मतदार यादीत आपले नाव आहे किंवा नाही हे तपासून घेण्याचे आवाहन निवडणूक विभागाने केले आहे. तसेच, नाव, छायाचित्र व पत्ता बरोबर आहे किंवा नाही हे तपासून घ्यावे.
पुणे जिल्ह्यातून 45 हजार मतदारांची नावे वगळण्यात आली आहेत. दोन मतदारसंघात नाव असल्यास एका यादीतील नाव वगळण्यात आले आहे. मृत मतदारांची नावे वगळण्यात आली आहेत. तसेच, बाहेरील राज्यातील स्थलांतरीत मतदारांची नावेही काढण्यात आली आहेत. तर, 1 लाख 21 हजार 763 मतदार वाढले आहेत. वयांची 18 वर्षे पूर्ण झालेल्या तरूण व तरूणींना मतदार नाव नोंदणी करता येते. ही मोहिम 30 नोव्हेंबरपर्यंत सुरू राहणार आहे. आता नोंदणी झाल्यास पुढील वर्षी होणार्या लोकसभा व विधानसभा निवडणूक मतदान करता येणार आहे.
मतदान केंद्रांची संख्या वाढणार
मतदार नोंदणी मोहिमेत मोठ्या संख्येने नव मतदारांची नोंदणी करण्यात आली आहे. मतदारांची संख्या वाढल्याने मतदान केंद्रांची संख्याही वाढविण्यात आली आहे. चिंचवड विधानसभा मतदार संघात 18 आणि भोसरी मतदार संघात 17 केंद्रांची नव्याने भर पडली आहे. चिंचवड मतदार संघात 528, पिंपरी मतदार संघात 399 आणि भोसरी मतदार संघात 464 मतदार केंद्र असणार आहेत.
विधानसभा-पुरूष-महिला-तृतीयपंथी-एकूण
चिंचवड -3,11,528-2,74,167-36-5,85,736
पिंपरी -1,91,938-1,71,869-22-3,63,829
भोसरी -2,89,397-2,37,374-87-5,26,858