पिंपरी | निर्भीडसत्ता न्यूज
निगडी येथील अप्पू घर व वॉटर पार्ककडे मालमत्ताकराची ८ कोटींची थकबाकी आहे. पुष्पक अमेझेट या संस्थेकडून ही थकबाकी वसूल करणे आवश्यक असताना महापालिकेच्या कर संकलन विभागाचे अधिकारी त्याची वसुली करत नाहीत. याप्रकरणात महापालिका आयुक्त शेखर सिंह यांनी जातीने लक्ष घालून ज्या पद्धतीने सर्वसामान्य करदात्याकडून थकबाकी वसुली केली जाते, त्याप्रमाणे या संस्थेकडून ८ कोटींची थकबाकी वसूल करावी, अशी मागणी पिंपरी चिंचवड भाजपचे शहर सरचिटणीस सचिन काळभोर यांनी केली आहे.
यासंदर्भात सचिन काळभोर यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, निगडीतील अप्पू घर व वॉटर पार्ककडे मा मालमत्ता कराची ८ कोटी थकबाकी आहे. ही रक्कम पुष्पक अमेझेट या संस्थेकडून वसूल करणे अपेक्षित आहे. मात्र महापालिकेच्या करसंकलन विभागाचे अधिकारी थकबाकी वसूल करत नाहीत. पुष्पक अमेझेट या संस्थेने न्यायालयात मालमत्ता कर थकबाकी रक्कम प्रकरणी दावा दाखल केला होता. तो दावा निकाली काढण्यात आला असून महापालिकेच्या करसंकलन विभागाचे अधिकारी आर्थिक देवाणघेवाण करून संस्थेकडून कर वसूल न करता सहकार्य करत आहेत.
शहरातील सामान्य करदात्यांनी कर न भरल्यामुळे त्यांच्या मालमत्ता जप्त करण्यात आल्या आहेत. त्याचप्रमाणे कलम ४२ व ४३ अंतर्गत कर न भरणाऱ्या नागरिकांच्या मालमत्तेतील टीव्ही व फ्रीज महापालिकेचा करसंकलन विभाग जप्त करत आहे. एवढेच नाही तर मुदतीत कर न भरल्यास करावर दोन टक्के विलंब शुल्क आकारून सामान्य करदात्यांना दंड ठोठावला जात आहे. दुसरीकडे राजकीय वरदहस्त आहे म्हणून अप्पूघर व वॉटर पार्ककडे थकबाकी असलेला मालमत्ता कर वसूल करण्यासाठी जाणूनबुजून टाळाटाळ केली जात आहे. या प्रकरणात आयुक्त शेखर सिंह यांनी जातीने लक्ष घालून ८ कोटींची थकबाकी वसूल करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.