नगरसेविकांच्या पतीसह सहा जणांवर गुन्हा
पिंपरी- वैदू जातपंचायतीच्या पंचानी दिलेल्या निर्णायाला विरोध दर्शवल्यावर कुटुंबावर बहिष्कार टाकल्याचा प्रकार पुण्यानंतर पिंपरी-चिंचवडमध्येही समोर आला. या प्रकरणी सांगवी पोलीस ठाण्यात भाजप नगरसेविकेच्या पतीसह सहा जणांवर सामाजिक बहिष्कार प्रतिबंध कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राजु रामा लोखंडे, प्रकाश रामा लोखंडे, दशरथ हुसेन लोखंडे, संभा बापू लोखंडे, शंकर यल्लापा लोखंडे, हणुमंत लक्ष्मण लोखंडे आणि इतर (रा. वैदुवस्ती, पिंपळे गुरव) यांच्याविरुध्द गुन्हा दाखल झाला आहे. त्यापैकी राजू लोखंडे हे भाजपच्या नगरसेविका चंदा लोखंडे यांचे पती आहेत. या प्रकरणी रामभाऊ लोखंडे (वय 70) यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या जात पंचायतीच्या निर्णयाला रामभाऊ यांनी विरोध केला. त्यामुळे त्यांना मारहाण करून बहिष्कृत केले. तसेच, येथील समाजाच्या मंदिरात येण्यास मज्जाव केला. त्यानंतर विनंती 50 हजार रुपये भरून लोखंडे व त्यांच्या कुंटुंबाला पंचानी समाजात परत घेतले. त्यानंतर पुन्हा जातपंचायतचा विरोध करून त्यांचे निर्णय अमान्य केल्यामुळे त्यांच्यावर व कुटुंबावर बहिष्कार टाकण्यात आला. त्यामुळे अखेर रामभाऊ यांनी पोलिसांकडे तक्रार केली. सांगवी पोलीस तपास करीत आहेत.