निर्भीडसत्ता न्यूज –
दिल्ली ग्रेटर नोएडा येथे झालेल्या ‘मारुती सुझूकी एसई सुप्रा इंडिया २०१७’ या राष्ट्रीय फॉर्म्युला स्पर्धेमध्ये पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या (पीसीईटी) निगडीतील पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगने (पीसीसीओई) उपविजेता पद मिळविले.
जुलै २०१७ मध्ये दिल्लीतील बुध्द इंटरनॅशनल सर्किट, ग्रेटर नोएडा, फॉर्म्युला रेसिंग ट्रक येथे झालेल्या या सहाव्या मारुती सुझूकी एसएई सुप्रा इंडिया स्पर्धेत देशभरातून १११ अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या संघांनी सहभाग घेतला होता. या मध्ये नामांकित महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यासोबत स्पर्धा करुन पिंपरी चिंचवड कॉलेजच्या यांत्रिकी विभागाच्या ‘क्रेटॉस रेसिंग’ टिमने ओव्हर ऑल गटात व्दितीय क्रमांकाचे १ लाख रुपयांचे रोख पारितोषिकासह पाच असे एकूण एक लाख नव्वद हजार रुपयांची पाच पारितोषिक पटकावली. या घवघवीत यशाबद्दल महाविद्यालयाच्या वतीने सहभागी विद्यार्थ्यांचा सत्कार व कौतुक सोहळा संपन्न झाला.
यावेळी पीसीईटीचे अध्यक्ष माजी आमदार ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्षा पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त भाईजान काझी, माजी मंत्री व विश्वस्त हर्षवर्धन पाटील, कार्यकारी संचालक डॉ. गिरीष देसाई, प्रशासन अधिकारी, पद्माकर विसपुते, प्राचार्य डॉ. अ.म.फुलंबरकर, विद्यार्थी, पालक व शहरातील उद्योजक उपस्थित होते.