निर्भीडसत्ता न्यूज –
चिंचवडच्या एम्पायर इस्टेट उड्डाणपुलाला संत मदर तेरेसा हे नाव देण्याचा निर्णय झालेला आहे. तरी देखील सत्ताधारी भाजपकडून हे नाव बदलण्याचा घाट घातला आहे, असा आरोप राष्ट्रवादीच्या माजी महापौर मंगला कदम यांनी केला आहे. या निर्णयाला कडाडून विरोध करणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
महापालिकेच्या संबधित समित्यामार्फत ठराव मंजूर होऊन त्यावर तत्कालीन आयुक्तांची मंजुरी मिळालेली आहे. भाजपकडून हे नाव बदलण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे सांगून मंगला कदम म्हणाल्या की, समितीच्या ठरावाला आयुक्तांनी मान्यता दिलेली असल्यास त्या ठरावात दुरुस्ती किंवा बदल करण्याचा अधिकार नसतो. मात्र, या पुलाच्या नामकरणाबाबत अ प्रभागाच्या मंगळवारी (दि. १२) होणा-या मासिक बैठकीपुढे ठराव आहे. तो चुकीचा असल्याने तो दप्तरी दाखल करण्याची मागणी कदम यांनी केली आहे.
सत्ताधा-यांना नागरिकांच्या जिव्हाळ्याचा एकही प्रश्न सोडविता आलेला नाही. पदाधिका-यांमध्ये एकसुत्रता नाही. कारभार संथ झाला असून शहरात कचरा, पाण्याची गंभीर समस्या आहे. समस्या सोडवून नागरिकांना दिलासा देण्याऐवजी नामकरणावरून राजकारण केले जात असल्याचा आरोप कदम यांनी पत्रकार परिषदेत केला.