निर्भीडसत्ता न्यूज –
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आरोग्य वैद्यकीय अधिकारीपदासाठी डॉ. अनिल रॉय यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्यांनी या बढती प्रक्रियेला स्थगिती देण्याची विनंती केली आहे.
मागील पाच वर्षांपासून डॉ. रॉय हे आरोग्य वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत आहेत.
दरम्यान, राज्य सरकारच्या नगरविकास विभागाने महापालिकेला आरोग्य वैद्यकीय अधिकारी पदाबाबत फेरविचार करण्याचा आदेश दिले होते. या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या पदोन्नती समितीने डॉ. साळवे यांची शिफारस करत निर्णय घेण्यासाठी प्रस्ताव विधी समितीकडे पाठविला. विधी समितीने 8 सप्टेंबर रोजी आरोग्य वैद्यकीय अधिकारी पदासाठी डॉ. साळवे यांच्या नावाची शिफारस महासभेकडे केली आहे. त्या पार्श्वभूमीवर डॉ. रॉय यांनी यापूर्वी स्वेच्छानिवृतीचा अर्ज प्रशासनाकडे केला. त्यातही त्यांनी विधी समिती व प्रशासनाचा आपल्यावर विश्वास नाही. तसेच, प्रशासन राजकीय दबावाला बळी पडले असून मी पदावर राहणे योग्य नसल्याचे म्हटले होते.
या अर्जानंतर त्यांनी आता पद वाचविण्यासाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. याचिकेत डॉ. रॉय यांनी राज्य शासन, महापालिका, पदोन्नती समिती आणि डॉ. साळवे यांना याचिकेमध्ये प्रतिवादी केले आहे.