परमपूज्य सद्गुरु प्रल्हाद वामनराव पै यांना मानपत्र प्रदान
निर्भीडसत्ता न्यूज –
सद्गुरू प्रल्हाद वामनराव पै यांचे विचार हे माणसाच्या मनामध्ये स्फुल्लिंग जागवणारे असतात. त्यामुळे मनाला प्रेरणा मिळते. आपल्याला मदत करण्यासाठी सर्वजण असतात परंतु, आपल्याला खरी मदत मिळते ती आपल्या मनाकडूनच. म्हणूनच ‘तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार’ ही भावना प्रत्येकाच्या मनात बिंबविण्याचे काम सद्गुरु प्रल्हाद पै करत आहेत. असे प्रतिपादन पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांनी केले. भोसरीतील श्री ज्ञानेश्वर माऊली पुण्यस्मरण सोहळ्यात प्रल्हाद वामनराव पै यांना पिंपरी-चिंचवड शहराच्या वतीने गिरीश बापट यांच्या हस्ते मानपत्र प्रदान करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.
महापौर नितीन काळजे, खासदार अमर साबळे, आमदार महेश लांडगे, उपमहापौर शैलजा मोरे, सभागृह नेते एकनाथ पवार, स्थायी समिती अध्यक्षा सीमा सावळे, नगरसेवक अमित गावडे, बाबू नायर, महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर, क्रीडा समितीचे सभापती लक्ष्मण सस्ते, नगरसेवक राहुल जाधव, विलास मडेगिरी आदी उपस्थित होते.
पालकमंत्री गिरीश बापट म्हणाले, जीवनविद्या मिशनचे कार्य मोठे आहे. प्रल्हाद पै यांची वाणी ऐकण्यासाठी सर्वसण आतूर असतात. त्यांची वाणी ऐकून चांगली भाषणे देता येतात. नागरिकांवर चांगले संस्कार होतात. जीवनामध्ये परिवर्तन होण्याकरिता, हातातून चांगले कार्य होण्याकरिता जीवनविद्यामिशन प्रेरणा देते. माणूस जेव्हा पुढे जाईल. तेव्हा राष्ट्र पुढे जाते. आशीर्वाद, भावनेने काम होत नाहीत. त्याला व्यवहाराची जोड लागते. माणसाच्या मनाला स्फूर्ती देण्याचे कार्य प्रल्हाद पै यांच्या प्रबोधनातून होत असते असे बापट म्हणाले.
बापट पुढे म्हणाले की, आपणाला मदत करण्यास सगळेच आहेत. परंतु, त्याअगोदर तुला तुझे मनच मदत करायला तयार आहे. दुसरा कोणी नाही. तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार ही भावना प्रत्येकाच्या मनात बिंबविण्याचे काम सद्गुरु प्रल्हाद पै करत आहेत. सद्गुरुंना पिंपरी-चिंचवड शहराच्या वतीने मानपत्र देऊन गौरविल्याने शहराचा सन्मान वाढला आहे. अशा विचारांचा सन्मान या नगरीत झाला याचा आनंद आहे. पिंपरी-चिंचवड शहर केवळ औद्योगिकनगरी नव्हे तर सांस्कृतिकनगरी देखील आहे, असेही बापट म्हणाले. सद्गुरु प्रल्हाद पै यांनी पुणे जिल्ह्यात प्रबोधनासाठी वेळ काढावी, अशी विनंती देखील बापट यांनी सद्गुरुंना केली. मानपत्राचे वाचन जीवनविद्या शैलेश जोशी यांनी केले.