निर्भीडसत्ता न्यूज –
कोणताही नेता, पक्ष वा संघटना मुंबईवर आपला हक्क सांगू शकत नाहीत. सध्या मुंबईवर दावा करणारे नेते हे अद्याप रूफटॉपवरच अडकले आहेत. अशा परिस्थितीत खरी मुंबई कोणती हे ज्यांना कळले, त्यांनी कोणत्याही व्यासपीठावर आपल्यासमोर यावे, असा सणसणीत टोला शिवसेनेचे नाव न घेता मुंबई भाजपचे अध्यक्ष आमदार अॅड. आशिष शेलार यांनी लगावला. आता परिस्थिती अशी आहे की, कामगार जगला तर नेते जगतील आणि नेते जगले तर राजकाण टिकेल, असे मतही त्यांनी व्यक्त केले.
मुंबईसह राज्यातील शासकीय आरे दुग्धशाळेला पुन्हा गतवैभव मिळवून देण्यासाठी, कामगारांच्या सर्व मागण्यांवर तोडगा काढण्यासाठी, येत्या महिन्याभरात मुख्यमंत्र्यांसोबत बैठक आयोजित करून आरे दुग्धशाळा पुन्हा सुरु करू, अशी ग्वाही देखील अॅड. शेलार यांनी मुंबईतल्या एका कार्यक्रमात दिली. निमित्त होते मुंबईतल्या वरळी येथील आरे दुग्धशाळेत भाजपप्रणीत राष्ट्रीय श्रमिक आघाडी व शासकीय मुंबई दुग्ध योजना या राज्य शासन पुरस्कृत संघटनेच्या नामकरण फलकाच्या उद्घाटन समारंभाचे. यावेळी आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष यशवंत भोसले, मुंबई प्रदेशाध्यक्ष राजाराम भोसले, पदाधिकारी, कामगार व त्यांचे कुटुंबीय मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यशाळेच्या आवारातच आघाडीने आयोजित केलेल्या जाहीर सभेत बोलताना आरे या ब्रॅंन्डच्या व खपाच्या आपल्या जुन्या आठवणींना शेलार यांनी उजाळा दिला. पश्चिम महाराष्ट्रातील काही नेत्यांचे दूध संघ चांगले चालावेत व त्यांच्या ब्रॅंन्डचा खप मुंबईसह राज्यात पसरावा यासाठी त्या-त्या वेळच्या राज्यकर्त्यांनी प्रचंड नफ्यात असलेल्या शासकीय दुग्ध योजनेला भंगारात काढले, असा आरोपही अॅड. शेलार यांनी केला. एखादा वेळेस ही दुग्धशाळा मेली तरी चालेल पण माझा मतदारसंघ टिकला पाहिजे ही भूमिका प्रत्येक राज्यकर्त्यांनी घेतल्याने आज आरे सारख्या दुग्धशाळा मोडित गेल्याचा गौप्यस्फोटही आमदार अॅड. शेलार यांनी केला.
आमदार अॅड. शेलार पुढे म्हणाले की, “वरळी डेरीचा माझा फारसा अभ्यास नाही तरी आपण विधानसभेत त्या-त्या वेळी विविध मार्गांनी यासंदर्भात चर्चा घडवून आणल्या आहेत. त्यामुळे आरे डेअरी पुन्हा पुर्ववत सुरू करण्यासाठी मी स्वतः दुग्धविकास आयुक्तांशी चर्चा करेन. डेअरीच्या वसाहतीतील कामगारांच्या हक्काची घरे, कामगारांच्या मुलांना याच डेअरीत अनुकंपा तत्वावर नोकरी देणे, आणि कामगारांच्या बदल्यांच्या प्रश्नांवर पुढील एक महिन्यात मुख्यमंत्र्यांसोबत बैठक लावून त्यातून सकारात्मकच तोडगा काढण्यात येईल. मी स्वतः वकील असल्याने तुमची वकिली तीही फुकटात मुख्यमंत्र्यांसमोर करेन. पण आरे बंद पडू देणार नाही. कामगारांना वा-यावर सोडणार नाही अशी ग्वाही देत; खाजगीकरणाला आमचा विरोध नाही पण विकास हा मानवतावादी असायला हवा, तो भकास करण्यासाठी नसावा याच मताचे पंतप्रधान मोदी व मुख्यमंत्री फडणवीस असल्याचे सडेतोड प्रतिपादनही त्यांनी केले.
दरम्यान आपल्या प्रास्ताविकात बोलताना राष्ट्रीय अध्यक्ष यशवंत भोसले यांनीही आरे दुधाच्या प्रचंड खपाच्या व शालेय जीवनातील या दुधाच्या भूतकाळातील आठवणींना उजाळा दिला. या डेअरीची मुंबईसह राज्यात शेकडो एकर जमीन विविध जिल्ह्यांच्या शहरात मोक्याच्या ठिकाणी असल्याचे सांगितले. कधीकाळी येथे शिवसेनेची युनियन होती. पण फक्त दुकान चालवण्याचेच काम त्यांनी अधिका-यांच्या मदतीने केल्याने आज नफ्यात चालणारी शासकीय दुग्ध संस्था मोडीत निघाल्याचा आरोप भोसले यांनी केला.
सभेचे उद्घाटन आमदार अॅड. शेलार यांच्या हस्ते करण्यात आले. तर भाजपप्रणीत राष्ट्रीय आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष यशवंत भोसले, मुंबई अध्यक्ष राजाराम भोसले व पदाधिका-यांच्या वतीने आमदार अॅड. शेलार यांचा शाल, श्रीफळ, खास शिंदेशाही पगडी व चांदीची तलवार देऊन सत्कार करण्यात आला.