निर्भीडसत्ता न्यूज –
पिंपरी-चिंचवड शिवसेना शहरप्रमुखपदी योगेश बाबर यांची निवड करण्यात आली आहे. अशी माहिती शिवसेना सचिव व खासदार अनिल देसाई यांनी शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून पाठवलेल्या पत्रकातून ही माहिती दिली आहे. त्यांच्या निवडीसाठी खासदार श्रीरंग बारणे यांनी पक्षाकडे शिफारस केली होती.
गेल्या चार वर्षांपासून राहुल कलाटे यांच्याकडे शिवसेना शहरप्रमुखपद होते. कलाटे यांनी चिंचवड विधानसभा मतदारसंघातून 2014 ची विधानसभा निवडणूक लढवली होती. फेब्रुवारी 2017 मध्ये झालेल्या पालिका निवडणुकीत ते वाकड येथून नगरसेवकपदी निवडून आले होते. सध्या त्यांच्याकडे पालिकेचे गटनेतेपद आहे. कलाटे हे आगामी विधानसभा निवडणूक लढवणार असल्यामुळे त्यांनी चिंचवड विधानसभा मतदार संघावर लक्ष केंद्रित केले आहे. त्यासाठी शहरप्रमुख पदातून मुक्त करण्याची विनंती त्यांनी पक्षाकडे केली होती.
योगेश बाबर यांना मोठी राजकीय पार्श्वभूमी आहे, चुलते गजानन बाबर हे शिवसेनेचे आमदार व खासदार राहिले आहेत. वडील मधुकर बाबर, चुलते प्रकाश बाबर, चुलती शारदा बाबर यांनी पिंपरी चिंचवड महापालिकेत नगरसेवकपद भूषविले आहेत.