निर्भीडसत्ता न्यूज –
कोयनानगर चौकात सातत्याने होणारी वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापलिकेचे सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार यांनी बुधवारी (दि.17) सायंकाळी या भागाचा निगडी वाहतूक पोलीस अधिका-यांसह पाहणी दौरा केला. वाहतूक कोंडीवर मात करण्यासाठी, रस्त्यावरील अतिक्रमणे, अनधिकृत पार्किंग हटवून आणि आवश्यक बदल करून ही समस्या सोडवा, अशा सूचना पक्षनेते एकनाथ पवार यांनी वाहतूक पोलिसांना दिल्या आहेत.
यावेळी नगरसेविका योगिता नागरगोजे, निगडी वाहतूक विभागाचे पोलीस निरीक्षक दुर्योधन पवार, पोलीस कर्मचारी दत्तात्रय राऊत, राहुल धोत्रे, प्रदीप मरभळ, विकास आवटे, परिसरातील ज्येष्ठ नागरिक, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शहरातील वाहतूक समस्येबाबत महापालिकेच्या आयुक्तांच्या दालनात दोन दिवसापूर्वी वाहतूक पोलीस व पालिका प्रशासनाची संयुक्त बैठक पार पडली. त्यानंतर सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार यांनी कृष्णानगर, कोयनानगर, भाजी मंडई या भागातील पार्कींग, ट्रॅफिकची स्वतः पाहणी केली. एकूणच या चौकातील परिसरातील विविध प्रश्नांमुळे येथील वाहतूक समस्या गंभीर झाली असून वाहतूक कोंडीतून मार्ग काढताना नागरिकांची दमछाक होत असल्याचे पक्षनेते पवार यांनी सांगितले.
शहरातील मोठ्या वाहतूकीच्या रस्त्यावरील बेकायदेशीररित्या पार्किंग केलेल्या वाहनांवर कायदेशीर कारवाई करावी. शहरात विविध ठिकाणी पडून असलेली बेवारस वाहने, शहरात अनेक ठिकाणी वाहने तोडफोडीच्या अथवा जाळपोळ या सारख्या घटना प्रामुख्याने वाहने पार्किंगच्या कारणाने होताना दिसतात. त्यावर आवश्यक उपाययोजना केल्या जाव्यात अश्या सूचना पक्षनेते एकनाथ पवार यांनी निगडी वाहतूक पोलिसांना केल्या.
यावेळी कोयनानगर येथील नागरिकांनी पक्षनेते एकनाथ पवार यांच्याशी संवाद साधला, कोयनानगर या भागात दारुड्यांचा खूप त्रास होत असतो, याठिकाणी दारुडे रस्त्यावरच हातात ग्लास घेत दारू पित असतात, घरांवर दगडी मारणे, शिवीगाळ करणे, रात्री दोन वाजेपर्यन्त या ठिकाणी दारू पित बसलेले असतात. त्यामुळे या ठिकाणी भांडणाचे प्रकार वाढत असून आम्हाला याचा नाहक त्रास सहन करावा लागत असल्याचे येथील नागरिकांनी पक्षनेते पवार यांना सांगितले. पक्षनेते एकनाथ पवार यांनी या परिसरातील पोलिसांशी संपर्क करून त्याठिकाणी त्यांना त्वरित बोलवून हा सर्व प्रकार निदर्शनास आणून दिला आणि या रस्त्यावर अवैध दारू पिणाऱ्यांवर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या.