निर्भीडसत्ता न्यूज –
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने निगडीतील भक्ती-शक्ती उद्यानामध्ये सुमारे १०७ मीटर उंच राष्ट्रध्वजाचे येत्या प्रजासत्ताक दिनी (२६ जानेवारी) ध्वजारोहण करण्यात येणार आहे. त्याचे काम पूर्ण झाले असून उपमहापौर शैलजा मोरे व सत्तारुढ पक्षनेते एकनाथ पवार यांच्या उपस्थितीत त्याची रंगीत तालीम शुक्रवारी (दि. १९) घेण्यात आली.
यावेळी नगरसेवक चिखले, अमित गावडे, सुमन पवळे, कमल घोलप, राजू मिसाळ, शर्मिला बाबर, सचिन कार्यकारी अभियंता सतिश इंगळे, उपअभियंता अनिल शिंदे आदी उपस्थित होते. निगडीतील भक्ती-शक्ती चौकात छत्रपती शिवाजी महाराज व संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांच्या भेटीवर आधारित शिल्पसमूह आहे. हे पिंपरी-चिंचवड शहराचे प्रवेशद्वार समजले जाते. त्या ठिकाणी देशातील सर्वात उंच राष्ट्रध्वज महापालिकेच्या वतीने उभारण्यात आला आहे.
याबाबत सत्तारुढ पक्षनेते एकनाथ पवार म्हणाले की, हा राष्ट्रध्वज पिंपरी-चिंचवड शहराचा भूषण ठरणार आहे. ध्वज उभारणीची चाचणी यशस्वी झाली. सर्व काम पूर्ण झाले असून प्रजासत्ताकदिनी (26 जानेवारी) समारंभपूर्वक राष्ट्रध्वज उभारुन त्याचे उद्घाटन केले जाणार आहे.