निर्भीडसत्ता न्यूज –
पिंपळे गुरव येथील देवकर पार्क येथे अनधिकृत बांधकामावर चार दिवसांपासून कारवाई करत आहेत. तेथे कारवाई सुरू असताना महिलेने आत्महत्या केल्याची घटना अत्यंत क्लेशदायक आहे. एवढे मोठे अनधिकृत बांधकाम झाले. त्याला जबाबदार अधिका-यांची चौकशी करून संबंधित दोषी अधिका-यांवर कारवाई होईल, अशी भूमिका पिंपरी-चिंचवड महापालिकेतील सत्तारुढ पक्षनेते एकनाथ पवार यांनी मांडली.
पक्षनेते एकनाथ पवार पुढे म्हणाले की, अनधिकृत बांधकामे नियमित करण्याबाबत राज्यातील तत्कालीन सत्ताधारी सरकारच्या विरोधात रस्त्यावर उतरलो होतो. त्यासाठी आमदार लक्ष्मण जगताप यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकारकडे पाठपुरावा केला. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी न्यायालयात अधिसूचना जाहिर केली. त्यामुळेच अनधिकृत बांधकामे नियमित करण्याची प्रक्रिया सुरू झाली. यासंदर्भातील नियमावलीतील किचकट बाबी बाजुला काढण्यासाठी वेळ लागणार आहे. तसेच, शास्ती कराबाबत सरकारने निर्णय घेतला. राष्ट्रवादी व काँग्रेसने शास्तीकराचे हे “भूत” नागरिकांच्या मानगुटीवर बसविले आहे.
गेल्या सहा दिवसांपासून विरोधकांकडून अनधिकृत बांधकामे, शास्ती कराचा मुद्दा उपस्थित करून वातावरण चिघळले जात आहे. आम्ही नागरिकांच्या विरोधात मुळातच नाही. उलट अशी बांधकामे वाचविण्याचा निर्णय हा आमच्या सरकारने घेतला. पालिकेतील तत्कालीन सत्ताधारी राष्ट्रवादीच्या कार्यकाळात अनधिकृत बांधकामांना समर्थन दिले गेले. त्यामुळे शहरात मोठ्या प्रमाणात अशी बांधकामे अढळून येतात. यापुढे नागरिकांनी अनधिकृत बांधकामे करू नयेत. कमर्सियल बांधकामे करुन नियमांचे उल्लंघन करू नये. रितसर परवानगी घेऊनच बांधकामे करावीत. पिंपळे गुरव येथील अनधिकृत इमारतीचे बांधकाम होत असताना गेली सहा महिने अधिकारी झोपले होते काय. संबंधितांना वेळीच नोटिसा देऊन नियंत्रण आणले असते, तर आज महिलेचा मृत्यू झाला नसता. ही घटना मनाला चटका देऊन जाणारी आहे, अशाही भावना पक्षनेते पवार यांनी व्यक्त केल्या.
महापालिकेतील सत्ताधारी भाजपने शास्तीकराच्या नावाखाली सावकारी धंदा सुरू केल्याचा आरोप शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी केला. त्याबाबत बोलताना पवार म्हणाले, अनधिकृत बांधकामे नियमित करण्याचा निर्णय आम्ही घेतला. शास्ती कर रद्द करण्याचाही निर्णय घेतला. आता ६०० ते १००० स्क्वेअर फुट व त्यापुढील बांधकामावरील शास्ती कर रद्द करण्यासंदर्भात मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे मागणी करणार आहोत. पाठपुरावा करून तोही प्रश्न सोडविला जाईल. शिवसेनेच्या खासदाराने याबाबत आम्हाला शहानपण शिकवण्याची गरज नाही, असे पवार यांनी म्हटले आहे.