निर्भीडसत्ता न्यूज –
पिंपरी-चिंचवड महापालिकेमध्ये समाविष्ट केलेल्या गावांकडे सगळ्यांनीच दुर्लक्ष केले. मात्र भाजप सत्ता येताच समाविष्ट गावांचा कायापालट करण्यास सुरुवात केली. यामुळे विरोधकांनी भ्रष्टाचाराचे खोटे-नाटे आरोप करायला सुरुवात केली आहे. आरोप करताना पुराव्याचा आधार असावा. विकासकामात कोणीही राजकारण आणू नये, असा सल्ला आमदार महेश लांडगे यांनी विरोधकांना दिला आहे.
समाविष्ट गावांमधील पहिल्या टप्प्यातील 90 कोटींच्या रस्त्यांच्या कामाचे रविवारी (दि. 28) आमदार लांडगे यांच्या हस्ते भूमिपूजन झाले. यावेळी महापौर नितीन काळजे, उपमहापौर शैलजा मोरे, स्थायी समिती अध्यक्षा सीमा सावळे, सत्तारुढ पक्षनेते एकनाथ पवार, क्रीडा समितीचे सभापती लक्ष्मण सस्ते, नगरसेविका भीमा फुगे, सुवर्णा बुर्डे, सारंग कामतेकर आदी उपस्थित होते.
आमदार लांडगे पुढे म्हणाले की,महापालिकेत समाविष्ट झालेल्या गावांकडे केवळ मतपेढी म्हणून पाहिले गेले. मी आमदार झाल्यापासून गेल्या तीन वर्षांत समाविष्ट गावातील विकासासाठी सर्वाधिक निधी खर्च केला आहे. महापालिका निवडणुकीत समाविष्ट गावातील नागरिक भाजपच्या पाठीमागे उभे राहिले. त्यांना आम्ही गावांच्या विकासाचे आश्वासन दिले होते. त्यानुसार आम्ही शब्द पाळला आहे. आम्ही सर्वांनी समाविष्ट गावाचा कायापालट करण्याचा निर्धार केला आहे. समाविष्ट गावात 425 कोटी रुपयांच्या खर्चाची कामे केली जाणार आहेत. त्यातील पहिल्या टप्प्यातील 90 कोटींच्या कामांचे आज भूमिपूजन झाले आहे. गेल्या 20 वर्षांत विकासापासून वंचित असलेल्या समाविष्ट गावांमधील अविकसित रस्ते आणि आरक्षणांच्या विकासाला प्राधान्य देण्यात आले आहे. हे नागरिकांनीच तपासून पहावे. सत्तेच्या माध्यमातून आम्ही जनसेवा करत आहोत’, असेही आमदार लांडगे म्हणाले.
महापौर नितीन काळजे म्हणाले, रस्ते झाल्यावर शेतक-यांना मोठा फायदा होईल. हे रस्ते करत असताना गेल्या 20 वर्षांत विकासापासून वंचित असलेल्या समाविष्ट गावांमधील अविकसित रस्ते आणि आरक्षणांच्या विकासाला प्राधान्य देण्यात आले आहे. याचे सर्व श्रेय भाजपचे शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप, आमदार महेश लांडगे यांचे आहे.