निर्भीडसत्ता न्यूज –
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने कासारवाडीमध्ये बांधण्यात येणा-या शाळेसाठी राज्यसभा खासदार रेखा गणेशन यांच्या खासदार निधीतून ३ कोटी रुपयांचा निधी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे जमा झाला आहे. त्यासाठीचे पत्र महापालिका आयुक्तांना जिल्हाधिकारी कार्यालयाने पाठविले आहे.
या निधीसाठी स्थानिक नगरसेवक श्याम लांडे पाठपुरावा करीत आहेत. कासारवाडी येथील सर्व्हे क्रमांक ४२० येथील छत्रपती शाहू महाराज विद्यामंदिराच्या आवारात ५ मजली प्रशस्त शाळा महापालिका बांधणार आहे. या शाळेच्या इमारतीसाठी १३ कोटी ७१ लाख ३२ हजार १९७ रुपये खर्च असून, त्या खर्चास स्थायी समितीने २६ डिसेंबरला मंजुरी दिली आहे. दोन वर्षांत इमारत बांधली जाणार आहे.
एकूण भूखंडाचे क्षेत्र ८ हजार ९११.३० चौरस मीटर आहे. सद्यःस्थितीत शाळेचे क्षेत्र ३ हजार ७८९.२१ चौरस मीटर आहे. २ हजार ८६१.८१ चौरस मीटरमध्ये बांधकाम करण्यात येणार आहे. इमारतीसाठी निधी मागण्यासाठी पत्र पाठविण्याची मागणी नगरसेवक लांडे यांनी आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे ८ नोव्हेंबर २०१७ ला केली होती. त्याला खासदार रेखा यांनी प्रतिसाद देत जानेवारी २०१८ ला जिल्हा नियोजन समितीकडे पत्र पाठवून निधी वर्ग करण्याची सूचना केली आहे. त्यानुसार ३ कोटींचा निधी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे नुकताच वर्ग झाला आहे.