निर्भीडसत्ता न्यूज-
पुणे महानगर परिवहन महामंडळ लि. (पीएमपीएमएल) चे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक तुकाराम मुंढे यांची बदली करावी, अशी मागणी पिंपरी महापालिकेतील सत्तारुढ पक्षनेते एकनाथ पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली होती. मुख्यामंत्र्यांकडे केलेल्या पाठपुराव्याला अखेर यश आले आहे. मुंढे पीएमपीचा कारभार सुधारण्याऐवजी कर्मचा-यांवर कारवाया करत असल्याने नगरसेवक, पदाधिकारी त्यांच्यावर नाराज असल्याचे एकनाथ पवार यांनी म्हटले होते.
पीएमपीएमएलचे व्यवस्थापकीय संचालक तुकाराम मुंढे यांनी वर्षभर संस्थेचा कार्यभार सांभाळला आहे. प्रवाशांना जलद प्रवासी सेवा पुरविणे, संस्थेला फायद्यात आणणे, प्रवाशांची सुरक्षितता ठेवणे आदी कारणांसाठी त्यांची नियुक्ती केली. मात्र, मुंढे यांनी अधिकारी, कर्मचारी यांच्या कामाची कोणतीही खातरजमा न करता त्यांच्यावर जुलमी कारवाई केली. कोणताही खुलासा न देता किरकोळ स्वरुपाच्या कारणांवरून कर्मचाऱ्यांना घरी बसवले. त्यामुळे हवालदिल झालेल्या कर्मचाऱ्यांनी पक्षनेते एकनाथ पवार यांच्याकडे दाद मागितल्याने यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मुंढे यांच्या बदलीचे निवेदन दिले होते.
मुंढे यांची पीएमपीएमएलच्या अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर त्यांनी बऱ्याच मार्गावरील बसेस बंद केल्या. त्यामुळे महामंडळाचे उत्पन्न कमी होऊन कर्मचाऱ्यांना घरी जावे लागले. संस्थेला पुणे व पिंपरी-चिंचवड महापालिकेकडून काही प्रमाणात अनुदान दिले जाते. मुंढे यांच्या उपदव्यापी कारभारामुळे पालिकेला जास्तीचे अनुदान द्यावे लागत होते. त्यांनी 210 कोटी 44 लाख रुपयांच्या संचालन तुटीची मागणी केली. एवढी रक्कम देण्याची वेळ आल्याने पालिकेतील सत्ताधारी पदाधिकारी मुंढे यांच्यावर रोष व्यक्त करीत होते. संबंधित विषयांवर बैठकीला हजर राहण्याचे सांगूनही मुंढे यांनी पालिकेचा अवमान केला होता.
पक्षनेते एकनाथ पवार यांनी संस्थेच्या कामकाजाबाबत सत्ताधारी भाजप या नात्याने काही महत्वाच्या सूचना केल्या असता, त्याची दखल मुंढे यांनी घेतली नसल्याचेही पक्षनेते पवार यांनी मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले होते. त्यांच्या गैरवर्तनाला चाप लावण्यासाठीच मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे पवार यांनी मुंढेंच्या बदलीची मागणी केली होती, अखेर पक्षनेते एकनाथ पवार यांच्या पाठपुराव्याला यश आले आहे.