निर्भीडसत्ता न्यूज –
पिंपरी-चिंचवड शहरातील घरोघरचा कचरा गोळा करणे व मोशी कचरा डेपो पर्यंत वाहतुक करण्याच्या कामास व त्यासाठी येणा-या खर्चासाठी आज (बुधवारी) स्थायी समितीच्या सभेत मान्यता देण्यात आली. आठ वर्षांसाठी दक्षिण भागासाठी ए. जी. इन्व्हायरो इंफ्रा प्रोजेक्ट्स प्रा. लि आणि उत्तर भागासाठी बी. व्ही. जी. इंडिया लि. या कंपनीला आठ वर्षांसाठी हे काम देण्यास मान्यता देण्यात आली.
स्थायी समिती सभेच्या अध्यक्षस्थानी सीमा सावळे होत्या. पुणे-मुंबई जुन्या महामार्गानुसार शहराचे दक्षिण व उत्तर असे दोन भाग करून दोन ठेकेदारांना हे काम देण्यात येत आहे. त्या भागातील घरोघरचा कचरा गोळा करून तो वाहनांतून मोशी कचरा डेपोत नेऊन टाकण्याचे काम आहे.दक्षिण भागासाठी ए. जी. इन्व्हायरो इंफ्रा प्रोजेक्ट्स प्रा. लि आणि उत्तर भागासाठी बी. व्ही. जी. इंडिया लि. या कंपनीच्या कमी दराच्या निविदा प्राप्त झाल्या आहेत. ए. जी. इन्व्हायरो कंपनीने पहिल्या वर्षासाठी २८ कोटी ५२ लाख ६९ हजार २०० रुपये आणि बीव्हीजी कंपनीने २७ कोटी ९० लाख १८ हजार ६०० रुपये दराने निविदा भरली आहे. दर वर्षी ५ टक्के वाढ देण्यात येणार आहे.