निर्भीडसत्ता न्यूज –
घरफोडी, वाहनचोरी करणा-या चार जणांना चिंचवड पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून तब्बल २१ गुन्हे उघडकीस आले असून त्यांच्याकडून 23 लाख रुपयांचा ऐवज हस्तगत करण्यात आला आहे.
राजू शंभू देवनाथ (वय १९, रा. कृष्णानगर, हडपसर), मंगेश विजय चव्हाण (वय २२, रा. गोखलेनगर), मजहर नॅजो जमादार (वय ३०, शिवाजीनगर), अल्ताफ उर्फ बचक्या पठाण यांना पोलिसांनी अटक केली आहे. तसेच, एक अल्पवयीन मुलालाही ताब्यात घेण्यात आले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चिंचवडमधील दळवीनगरमध्ये दुचाकीवरून जाणा-या दोघांना पकडले. त्यांनी उडवा-उडवीची उत्तरे दिल्याने पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. कसून चौकशीत चार जण मिळून चो-या करीत असल्याचे समोर आले.
त्यांच्याकडून शहरातील विविध पोलीस ठाण्यात दाखल २१ गुन्हे उघडकीस आले आहेत. एकूण ४०४ ग्रॅम सोन्याचे दागिने, १८०० ग्रॅम चांदीचे दागिने व चांदीची भांडी, ३ ऑटो रिक्षा, ६ दुचाक्या, ६ कॅमेरे, ७ घड्याळे, ७ मोबाईल फोन, १ लॅपटॉप, १ एलईडी टीव्ही, १ पिस्टल, ६ जिवंत काडतुसे, १ लोखंडी कटावणी असा एकूण २३ लाख ३५ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. ही कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीश कांबळे, पोलीस नाईक सुधाकर आवताडे, स्वप्नील शेलार, हृषीकेश पाटील, विजयकुमार आखाडे, पोलीस शिपाई चंद्रकांत गडदे, राहुल मिसाळ, देवा राऊत, पंकज भदाणे, विशाल आंबटवार, सचिन वर्णेकर, अमोल माने, गोविंद डोके, महिला पोलीस नाईक कांचन घवले यांनी केली.