निर्भीडसत्ता न्यूज –
पिंपरी चिंचवड महापालिका शहरासाठी सर्वसमावेश ज्येष्ठ नागरिक धोरण तयार करणार आहे. महापालिकेच्या स्थायी समिती सभागृहात सोमवारी (दि.५) झालेल्या बैठकीत या धोरणाबाबत चर्चा झाली. त्यानुसार शहरातील ज्येष्ठांसाठी विविध सुविधा उपलब्ध करून देत उपक्रम राबविण्याचे विचाराधीन असल्याचे सत्तारुढ पक्षनेते एकनाथ पवार यांनी सांगितले.
महापौर नितीन काळजे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या ज्येष्ठ नागरिक धोरणाबाबत सोमवारी महापालिकेत बैठक पार पडलीय. या बैठकीला उपमहापौर शैलजा मोरे, सत्तारुढ पक्षनेते एकनाथ पवार, स्थायी समिती अध्यक्षा सिमा सावळे, आयुक्त श्रावण हर्डीकर, महिला व बालकल्याण संमिती सभापती सुनिता तापकीर, आरती चौधे, मोनिका कुलकर्णी, ज्येष्ठ नागरिक महासंघाचे अध्यक्ष प्रभाकर कोळी यांच्यासह पदाधिकारी आदी उपस्थित होते.
शहरातील ज्येष्ठ नागरिकांना विविध सेवा-सुविधा उपलब्ध करून देणे. त्यांची महापालिकेच्या विविध उपक्रमांच्या यशस्वीतेसाठी मदत घेणे. महासंघ व ज्येष्ठांसाठी विरंगुळा केंद्र उभारणे. सातत्याने आरोग्य शिबीरे आयोजित घेणे. समुपदेशन कार्यक्रम, नाट्यग्रह, सिनेमाग्रहात सवलतीच्या दरात तिकिटे, आरक्षित जागा, ज्येष्ठ नागरिक दिन साजरा करण्यासारखे उपक्रम राबविले जातील. तसेच, त्यांच्या अडी-अडचणी सोडविण्याचा प्रयत्न या माध्यमातून केला जाईल, असे पक्षनेते एकनाथ पवार यांनी सांगितले.