निर्भीड न्यूज –
रहाटणी येथील ग्रामदैवत श्री काळभैरवनाथाचा यात्रोत्सव शनिवार, दि. 30 एप्रिल रोजी आयोजित करण्यात आला आहे. त्यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. ढोल-लेझीम-झांज, भजन, जंगी कुस्त्या आदी स्पर्धाही या वेळी होणार आहेत. यातील सर्व स्पर्धकांना सुमारे पाच लाख रुपयांचे बक्षीस दिले जाणार आहे.
शनिवार, दि. 30 एप्रिल रोजी पहाटे पाच वाजता ‘श्रीं’ची महापूजा व अभिषेक, सायंकाळी ‘श्रीं’ची काठी मिरवणूक रात्री छबिना पालखी मिरवणूक आणि रात्री ढोल-लेझीम स्पर्धा होणार आहे; यासह मनोरंजनाचा कार्यक्रम म्हणून ‘तमाशा’ होणार आहे, आशी माहिती श्री काळ भैरवनाथ यात्रा कमिटीचे आध्यक्ष देविदास नखाते यांनी दिली.
पिंपरी-चिंचवड कुस्तीगीर संघ यांच्या मान्यतेने रविवार, दि. 1 मे रोजी राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धा होणार आहे. राज्यासह परराज्यातील मल्लही या स्पर्धेत सहभागी होतात. पराभूत पैलवानांनाही या स्पर्धेत बक्षिस दिले जाते. ढोल-लेझीम पथकांनाही लाखोंचे बक्षीस दिले जाते.
प्रथम क्रमांकाच्या विजेत्यास 51 हजार रुपये रोख रक्कम व चांदीची गदा दिली जाते. व्दितीय क्रमांकाच्या विजेत्यास 30 हजार रोख, तृतीय क्रमांकाच्या विजेत्यास 20 हजार रोख अशी बक्षीसे दिली जातात, तर काही कुस्त्या वजनावर खेळविल्या जातात.
ढोल लेझीम स्पर्धेतील प्रथम क्रमांकाच्या विजेत्यास 51 हजार, व्दितीय क्रमांकाच्या विजेत्यास 41 हजार, तृतीय क्रमांकाच्या विजेत्यासाठी 31 हजार, चतुर्थ क्रमांकाच्या विजेत्यास 25 हजार, पाचव्या क्रमांकाच्या विजेत्यास 20 हजार तर सहाव्या क्रमांकाच्या विजेत्यास 15 हजार रुपयांचे बक्षीस दिले जाणार आहे.