निर्भीडसत्ता न्यूज –
नाशिकफाटा उड्डाणपुलाला पिंपळेगुरव, पिंपळेसौदागर, वाकड आणि हिंजवडीकडून पिंपरी, चिंचवड व मुंबईकडे जाण्यासाठी उभारण्यात आलेल्या रॅम्पचे तसेच सांगवी-किवळे बीआरटीएस रस्त्यावर वाय जंक्शन पिंपळेनिलख येथे बांधण्यात आलेल्या अंडरपासचे भाजप शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.
महापौर नितीन काळजे, स्थायी समिती सभापती ममता गायकवाड, सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार, नगरसेवक शत्रुघ्न काटे, तुषार कामठे, नगरसेविका सुनीता तापकीर, सुलक्षणा धर, आरती चोंधे, निर्मला कुटे, माजी नगरसेवक विजय लांडे, क्षेत्रीय अधिकारी आशा राऊत, सह शहर अभियंता राजन पाटील, प्रवीण तुपे, कार्यकारी अभियंता श्रीकांत सवणे, ज्ञानेश्वर जुंधारे, उपअभियंता विजय भोजने, संदेश खडतरे, सुरक्षा अधिकारी उदय जरांडे आदी उपस्थित होते.
नाशिक फाटा येथे हिंजवडी ते मोशी रस्ता छेदत असून सुरळीत वाहतूक व सिग्नल विरहीत वाहतूक होण्याच्या दृष्टीने नाशिक फाटा चौकामध्ये उड्डाणपुलाचे नियोजन करण्यात आले आहे. या रॅम्पमुळे पिंपळेगुरव, पिंपळेसौदागर, वाकड व हिंजवडी या भागाकडून येणाऱ्या वाहनांना पिंपरी, चिंचवड, निगडी व मुंबईकडे जाणे सोईस्कर होणार आहे. चौकातील प्रदूषण कमी होण्यास मदत होणार आहे. तसेच नाशिकफाटा चौक सिग्नल विरहित करणे शक्य होणार असून नागरिकांना वेळेत पोहचण्यासाठी मदत होणार आहे.
सांगवी ते किवळे बीआरटीएस रस्त्यावर वाय जंक्शन येथे बांधण्यात आलेल्या अंडरपासमध्ये ग्रेड सेपरेटरची एकूण लांबी ४९० मीटर इतकी असून रुंदी ७.५ मीटर व उंची ५.५ मीटर इतकी आहे. यामुळे जंक्शन फ्री होणार असून बीआरटीएस बस सेवा जलद होणार आहे. तसेच वाकडहून पुण्याकडे जाणाऱ्या वाहतुकीसाठी उपयुक्त ठरणार आहे.