निर्भीडसत्ता न्यूज –
सम्यक जनकल्याण प्रतिष्ठान, राज्यसभा खासदार अमर साबळे आणि भारत सरकारच्या सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालय, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या दिव्यांग सशक्तीकरण शिबिराचा लाभ घेतलेल्या लाभार्थ्यांना साहित्य वाटप करण्यात येणार असल्याची माहिती खासदार अमर साबळे यांनी दिली आहे. तसेच यावेळी युवकांना स्वयंरोजगाराची चालना मिळावी यासाठी ‘मुद्रा कर्ज महामेळावा’ आणि पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने ‘अर्थसहाय्य योजना मेळाव्याचेही आयोजन करण्यात आल्याची माहिती आमदार लक्ष्मण जगताप आणि आमदार महेश लांडगे यांनी दिली.
चिंचवड संभाजीनगर येथील साई उद्यान या ठिकाणी 25 मे रोजी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
पिंपरी येथे आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत खासदार साबळे यांनी ही माहिती दिली. यावेळी शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप, आमदार महेश लांडगे, उपमहापौर शैलजा मोरे, महिला मोर्चाच्या उमा खापरे, शैला मोळक, नगरसेवक माऊली थोरात, अमोल थोरात, विलास मडेगिरी यांच्यासह भारतीय जनता पक्षाचे अनेक नगरसेवक, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कल्याणकारी योजनेंतर्गत या शिबिराचे खासदार अमर साबळे यांनी आयोजन केले होते. निगडी प्राधिकरण येथील स्वातंत्र्यवीर सावरकर भवन या ठिकाणी पार पडलेल्या भव्य मोफत दिव्यांग सशक्तीकरण शिबिरामध्ये सुमारे 2100 लाभार्थीनी सहभाग नोंदवला होता.
दरम्यान, या शिबिरामध्ये तज्ञ डॉक्टरांच्या सहय्याने पिंपरी चिंचवड आणि पुणे शहरातील गरजू दिव्यांग नागरिकांच्या अवयवांचे मोजमाप करण्यात आले होते. तसेच कर्णबधिर गरजूंना कोणत्या साहित्याची गरज आहे याची पूर्वनोंदनी करण्यात आली होती. या सर्व गरजूंना कानपूर फूट, कॅलिपर्स, तीनचाकी सायकल, तीनचाकी स्कुटर, व्हील चेअर, कुबड्या, सर्जिकल शूज, श्रवणयंत्र, अंधांसाठी काठी, ब्रेल किट, सीपी चेअर आदी साहित्यांचे वितरण येत्या 25 मे रोजी करण्यात येणार आहे.
तसेच या कार्यक्रमांतर्गत पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने ‘अर्थसहाय्य योजना मेळाव्या’चेही आयोजन करण्यात आले आहे. आणि पिंपरी चिंचवड शहरातील तरुणांना स्वयंरोजगारास चालना मिळावी व त्यासाठी भांडवल उपलब्ध करून देण्याचा व त्यांना उद्योजक होण्यास प्रेरणा मिळावी यासाठी मुद्रा बँक महामेळाव्याचेही आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यात युवकांना मुद्रा बँक योजनेची सविस्तर माहिती देण्याबरोबरच कर्ज प्रकरणांची प्रक्रिया सांगण्यात येणार असून शहरातील जास्तीत जास्त युवकांनी व तरुण उद्योजकांनी या मेळाव्याचा लाभ घेण्याचे आवाहन कार्यक्रमाचे आयोजन खासदार अमर साबळे यांनी केले आहे.