निर्भीडसत्ता न्यूज –
उद्योगनगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पिंपरी-चिंचवड शहरातील तीन जणांनी चित्रपट निर्मिती क्षेत्रात पदार्पण केले आहे. ‘साई ॲग्रो टेक’ या संस्थेच्या माध्यमातून या तीन जणांनी पहिल्यांदाच या क्षेत्रात पाऊल टाकले आहे. शंभू ओव्हाळ, विजय जगताप, आणि अरविंद अडसूळ यांनी चित्रपट निर्मितीची धूरा सांभाळली आहे. महाराष्ट्राचे महागायक आनंद शिंदेही या चित्रपटाच्या माध्यमातून पहिल्यांदाच दिग्दर्शकाच्या भूमिकेतून चाहत्यांसमोर येणार आहेत. साई इंटरनॅशनल फिल्म आणि शिंदेशाही फिल्म प्रस्तूत ‘नंदू नटवरे’ या चित्रपटाची निर्मिती करण्यात येत आहे.
‘नंदू नटवरे’ हा धम्माल विनोदी मराठी चित्रपट आहे. जुहू येथे अजीवासन स्टुडिओत लोकगीताच्या रेकॉर्डिंगसह चित्रीकरणास सुरुवात करण्यात आली. आतापर्यंत त्याचे बहुतांश चित्रीकरण पूर्ण झाले आहे. रेकॉर्डींगसाठीचे लोकगीत स्वत: आनंद शिंदे यांनी गायले आहे. महाराष्ट्राला खूळ लावणारी लोकगीते आनंद शिंदे यांनी गायली आहेत. त्यात या लोकगीताची भर पडणार आहे. या चित्रपटाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे आनंद शिंदे यांचे सुपूत्र उत्कर्ष शिंदे यांची प्रमुख भूमिका या चित्रपटात आहे. या चित्रपटाच्या माध्यमातूनच प्रथमच ते अभिनय क्षेत्रात पदार्पण करीत आहेत. आदर्श आणि उत्कर्ष या शिंदे बंधूंचे संगीतदेखील या चित्रपटातील गाण्यांना लाभणार आहे. त्यामुळे शिंदेशाही समृध्दीचा थाटदेखील प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे.
गणेश आचार्य यांची ‘कोरिओग्राफी’
चित्रपटांतील गाण्यांवर लयबध्द ठेका धरायला लावणारे प्रख्यात नृत्य दिग्दर्शक अर्थात कोरिओग्राफर गणेश आचार्य यांची कोरिओग्राफी या चित्रपटाला लाभणार आहे. त्यामुळे तुफान नृत्याविष्काराचा या चित्रपटातून अनुभव घेता येणार आहे. गणेश आचार्य यांनी यातील सर्व गाण्यांसाठी नृत्य दिग्दर्शन केले आहे. त्यामुळे भन्नाट डान्स या चित्रपटात पाहता येणार आहे.
नामवंत कलाकारांच्या भूमिका
उत्कर्ष शिंदे यांच्यासह चित्रपटात नामवंत कलाकार दिसणार आहेत. मोहन जोशी, संजय कापरे, मुन्ना बी. के., रंगा शेठ, उषा नाईक, सूरज पाटील यासह अन्य कलाकारांनी यात भूमिका साकारल्या आहेत. रंगा शेठ यांनी यात खलनायकाची भूमिका वठवली आहे. रंगा शेठ साऊथ इंडस्ट्रितील नामवंत कलाकार आहेत. नेताजी काँग्रेस सेनेचे ते राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. आनंद सरोदे या चित्रपटाचे सहदिग्दर्शक आहेत.
निर्मात्यांचे कौतुक
नंदू नटवरे या चित्रपटाचे निर्माते पिंपरी-चिंचवड शहरातील आहेत. त्यामुळे या निर्मात्यांचे शहरात विशेष कौतुक होत आहे. शहरात या निर्मात्यांची आणि चित्रपटाची चर्चा रंगत आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने बॉलीवुडमधील चित्रपटाच्या दर्जाचे चित्रिकरण होत आहे. त्यासाठी निर्माता शंभू ओव्हाळ, विजय जगताप आणि अरविंद अडसूळ यांनी पूर्ण क्षमतेने काम सुरू केले आहे. त्यांच्या टीमसह ते यासाठी अथक परिश्रम घेत आहेत. पहिल्यांदाच आणि तेही ‘बिग बजेट’ चित्रपटाची निर्मिती त्यांच्याकडून करण्यात येत आहे. त्यांच्या या धाडसाचे पिंपरी-चिंचवडकरांसह चित्रपट निर्मिती क्षेत्रातील दिग्गजांकडून कौतुक होत आहे. यशासाठी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.