निर्भीडसत्ता न्यूज –
‘भारतीय विद्या भवन’ आणि ‘इन्फोसिस फाऊंडेशन’च्या सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत विलोभनीय भावमुद्रा, ताल आणि मुद्रा यांचा समन्वय साधणाऱ्या ‘दिशा- एक योग्य मार्ग’ या शास्त्रीय नृत्याच्या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. ‘नृत्ययात्री आर्ट मुव्हमेंट फाऊंडेशन’ यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम सादर होणार आहे.
ताल आणि मुद्रांचा नृत्याविष्कार असलेला हा कार्यक्रम शनिवार, दिनांक १६ जून २०१८ रोजी ‘भारतीय विद्या भवन’चे ‘सरदार महादेव बळवंत नातू सभागृह’, सेनापती बापट रोड येथे सायंकाळी ६ वाजता होणार आहे. ‘भारतीय विद्या भवन’चे मानद सचिव प्रा. नंदकुमार काकिर्डे यांनी ही माहिती पत्रकाद्वारे दिली.
नेहा आपटे आणि अंजली हरिहरन या भरतनाटयम् प्रकारातील सोलो नृत्य सादर करणार आहेत. नेहा आपटे या स्वाती दैठणकर व लावण्या अनंथ यांची शिष्या आहेत. तर अंजली हरिहरन या प्रमद्वारा कित्तूर व अनिता गुहा यांची शिष्या आहेत, अशी माहिती संस्थेच्या संस्थापक -संचालक मेघना साबडे यांनी दिली.
‘नृत्ययात्री आर्ट मुव्हमेंट फाऊंडेशन’
‘नृत्ययात्री आर्ट मुव्हमेंट फाऊंडेशन’ संस्थेच्या वतीने गेल्या ८ वर्षापासून विविध कार्यशाळा, व्याख्यान, प्रात्यक्षिकांच्या माध्यमातून शास्त्रीय नृत्याचे शिक्षण देत आहे. या कार्यशाळांमध्ये मार्गदर्शन करण्यासाठी अनेक नृत्य गुरूंना निमंत्रित केले गेले होते. यामध्ये सी.व्ही.चंद्रशेखर (भरतनाट्यम्), ब्रागा ब्रेसेल आणि प्रियदर्शिनी गोविंद (नृत्यातील अभिनय), शमा भाटे (नृत्य दिग्दर्शन), शेजिथ कृष्ण आणि परीमल फडके (तालबद्ध नृत्यातील पैलू), जानकी रंगराजन (कर्णाचा नृत्यातील वापर), वैभव अरेकर (नृत्य रंगमंच) या गुरूंचा समावेश होता. संस्थेच्या माध्यमातून अनेक तरूण वर्ग नृत्य शिक्षणाचा लाभ घेत आहे. नृत्य जगाची आवड असणार्यांना ‘नृत्ययात्री आर्ट मुव्हमेंट फाऊंडेशन’संस्था उत्तम व्यासपीठ ठरत आहे, अशी माहिती संस्थेच्या संस्थापक- संचालक मेघना साबडे यांनी पत्रकाद्वारे दिली.