निर्भीडसत्ता न्यूज –
पाऊस लांबल्यामुळे गृहप्रकल्पांच्या बांधकामांना परवानगी न देण्याचा निर्णय संपूर्ण पिंपरी-चिंचवड शहरासाठी लागू करावा, अशी मागणी राष्ट्रवादीचे नगरसेवक नाना काटे यांनी महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे केली आहे.
यासंदर्भात नगरसेवक नाना काटे यांनी आयुक्त हर्डीकर यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, महापालिका हद्दीत पिंपरी, भोसरी आणि चिंचवड या तीन विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे. परंतु, स्थायी समितीने पाऊस लांबल्यामुळे केवळ चिंचवड विधानसभा मतदारसंघातील गृहप्रकल्पांच्या बांधकामांना परवानगी न देण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय नागरिकांच्यादृष्टीने योग्य असला तरी चिंचवड मतदारसंघावर अन्याय करणारा आहे. शहरात फक्त चिंचवड मतदारसंघातच बांधकामे चालू आहेत का? बाकीच्या मतदारसंघात नवीन बांधकामे होतच नाहीत का? पाण्याचा प्रश्न संपूर्ण पिंपरी चिंचवडला भेडसावत असताना पाण्याचा अयोग्य वापर हा फक्त चिंचवड मतदारसंघातच जास्त होत आहे का? असे अनेक प्रश्न निर्माण होत आहेत.
पाणी टंचाईच्या काळात नागरिकांच्या मुलभूत सुविधावर ताण येतो हे जरी मान्य केले, तरी महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने पाण्याचे योग्य नियोजन केल्यास नागरिकांच्या मुलभूत सुविधावर ताण येणार नाही. स्थायी समितीने घेतलेला निर्णय एकटया चिंचवड मतदारसंघापुरता न घेता नागरिकांच्या हितासाठी घेतलेला हा निर्णय संपूर्ण पिंपरी-चिंचवड शहरासाठी लागू करावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.