निर्भीडसत्ता न्यूज –
पुणे शहराप्रमाणे पिंपरी-चिंचवड शहरासाठीही पॉर्किग पॉलिसी राबविण्यास महापालिका सर्वसाधारण सभेने शुक्रवारी मंजुरी दिली. या पार्किग पॉलिसीला राष्ट्रवादी काँग्रेसने विरोध केल्याने त्यांचा विरोध नोंदवून हा ठराव संमत करण्यात आला.
महापौर नितीन काळजे सभेच्या अध्यक्षस्थानी होते. वाहतूक नियंत्रण, इंधन बचत, सार्वजनिक वाहतुकीचा सुयोग्य वापर आणि त्यामुळे होणारे वैयक्तिक फायदे यांसाठी पिंपरी – चिंचवड महापालिकेने सशुल्क पार्किंग धोरण तयार केले आहे. त्यासाठी पार्किंगच्या जागांचे आणि वाहनांचेही वर्गीकरण करत दरपत्रक निश्चित करण्यात आले आहे. गावठाण भाग आणि झोपडपट्टींना यातून वगळण्यात आले आहे. पार्किंग सुविधेचा वापर करण्यास नागरिकांना प्रवृत्त करण्यासाठी मासिक पास उपलब्ध करुन देण्याची तरतूद धोरणामध्ये आहे. तर, सायकल, रुग्णवाहिका, दिव्यांगांची वाहने, मान्यताप्राप्त रिक्षा थांबे, यांना सशुल्क पार्किंगमधून सवलत देण्यात आली आहे. माहिती-तंत्रज्ञानाचा अवलंब करत महापालिका ‘पार्किंग अॅप’ विकसित करणार आहे.
दिल्ली, चेन्नई, पुणे, मुंबई, बंगळुरु, नागपूर या शहराच्या पार्किग पॉलिसींचा अभ्यास करण्यात आला आहे. त्याचे संगणकीय सादरीकरण नगरसेवकांपुढे करण्यात आले. रस्त्यावरच्या निर्देशित वाहनतळांवर पिवळे पट्टे आखून ही जागा वाहनतळासाठी असल्याचे स्पष्ट केले जाणार आहे. त्याचबरोबर या पिवळ्या पट्टयाच्या आत वाहन उभे करणेही आवश्यक असणार आहे. सर्व वाहनतळांवर फलक लावणे बंधनकारक असेल. या फलकांवर वाहनतळाचे दरपत्रक, वाहनतळाची क्षमता, कंत्राटदाराचे नाव व काही तक्रार करावयाची असल्यास तक्रारीसाठीचा दूरध्वनी क्रमांक इत्यादी तपशील असेल. सर्व वाहनतळांवर मासिक पासची सुविधा त्या – त्या वाहनतळांसाठी उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. परिणामी रस्त्यांवरील वाहतूक कोंडी कमी होऊन वाहतूक सुरळीत होण्यास मदत होणार आहे.