निर्भीडसत्ता न्यूज –
रोटरी क्लब ऑफ निगडीच्या वतीने भीमाशंकर येथील फालुदे ग्रामस्थांसाठी विहीर बांधून देण्यात आली आहे. सात हजार लीटर क्षमतेची ही विहीर असून यामुळे फालुदेगाव टँकर मुक्त होणार आहे. ही विहीर बांधण्यासाठी गावक-यांनी श्रमदान केले. या विहिरीचे लोकार्पण रोटरी क्लब ऑफ निगडीचे अध्यक्ष हेमंत कुलकर्णी व घोडेगाव पंचायत समितीचे गट विकास अधिकारी काळभोर यांच्या हस्ते नुकतेच झाले. तसेच हुतात्मा राजगुरु को-ऑपरेटिव्ह सोसायटीला बिस्किट बनविण्यासाठी मशिनरी भेट देण्यात आली.
यावेळी रोटरी क्लबचे उपाध्यक्ष विजय काळभोर, प्रोजेक्ट अधिकारी रो. सुहास ढमाले, सचिव प्रवीण घाणेगावकर, घोडेगाव पंचायत समितीचे गट विकास अधिकारी काळभोर, रोटरीच्या प्रथम महिला मुग्धा कुलकर्णी, माजी अध्यक्ष व रो. अरविंद खांडकर, गीता खांडकर, रो. सद्दाम, सुजाता ढमाले, रमा मांडगे, समाजसेवक अमोल वाघमारे यांच्यासह फालुदेग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हेमंत कुलकर्णी म्हणाले, ”फालुदेगावातील विहीरीची दुरावस्था झाली होती. त्यामुळे उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याची मोठी समस्या निर्माण होत होती. ग्रामस्थांना टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा लागत होता. रोटरी क्लब ऑफ निगडीने या विहीरीची दुरुस्ती केली. पहिली विहीर 20 फूट खोल करुन नव्याने बांधण्यात आली आहे. त्यामुळे फालुदे ग्रामस्थांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटणार आहे. या विहीरीची क्षमता सात हजार लीटर आहे. यामुळे उन्हाळ्यात फालुदे ग्रामस्थांना पाण्याची समस्या निर्माण होणार नाही. रोटरी क्लबच्या प्रयत्नांतून गाव टँकरमुक्त झाले आहे”.
त्याचबरोबर फालुदे येथील हुतात्मा राजगुरु को-ऑपरेटिव्ह सोसायटीला बिस्किट बनविण्यासाठीची मशिनरी भेट देण्यात आली आहे. याच्या माध्यमातून आदिवासी लोक स्वत:च्या पायावर उभे राहतील. त्यांना रोजगार उपलब्ध होईल, या उद्देशाने ही मशिनरी भेट देण्यात आली आहे. या मशिनरीचे लोकार्पण रोटरी क्लबचे माजी अध्यक्ष व रो. अरविंद खांडकर यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले.