टाळ, मृदुंगाच्या गजरात आणि “ज्ञानोबा माऊली तुकाराम” असा जयघोष करीत लाखो वारक-यांसह संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि संतश्रेष्ठ तुकाराम महाराज या दोन्ही पालख्या शनिवारी पिंपरी-चिंचवडकरांच्या सेवेनंतर पुणे शहरात दाखल झाल्या. महापालिका व नागरिकांचे स्वागत स्विकारल्यानंतर आषाढी वारीतील वारकरी पुण्यात मुक्कामी विसावले आहेत.
तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचा मुक्काम काल (गुरुवारी) आकुर्डीतील विठ्ठल मंदिरात होता. आरती केल्यानंतर पहाटे सहा वाजता पालखी मार्गस्थ झाली. संत तुकारामनगर येथील संत तुकाराम महाराज प्रतिष्ठानच्या वतीने पालखी सोहळ्याचे स्वागत करण्यात आले. भोसरीतील मॅग्झिन चौकात सुमारास संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्याचे शहरात आगमन झाले. लाखो वारक-यांच्या सुमारे 350 दिंड्या वारीत सहभागी झाल्या आहेत. महापौर नितीन काळजे, आमदार महेश लांडगे, उपमहापौर शैलजा मोरे, सत्तारुढ पक्षनेते एकनाथ पवार, आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्यासह परिसरातील नगरसेवक, पदाधिकारी उपस्थित होते.
पिंपरी-चिंचवडकर नोकरदार, कामगार वर्गाने पालखी सोहळ्यात ग्यानबा-तुकाराम यांचे दर्शन घेतले. पिंपरी चिंचवडकरांचे सेवा स्विकारल्यानंतर शनिवारी सायंकाळी दोन्ही पालख्या पुण्यात मुक्कामी दाखल झाल्या. पुणे शहरातील दोन मुक्कामानंतर दोन्ही पालख्या वेगवेगळ्या मार्गावरून पंढरीकडे मार्गस्थ होतील.