निर्भीडसत्ता न्यूज –
मनु हा संत तुकाराम आणि संत ज्ञानेश्वरांपेक्षाही श्रेष्ठ होता, असे विधान करणारे शिवप्रतिष्ठान संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संभाजी भिडे पुन्हा अडचणीत सापडण्याची शक्यता आहे. संभाजी भिडे यांच्या विधानाची व्हिडिओ क्लिप तपासून पाहू. त्यात असंवैधानिक आढळल्यास कारवाई करू, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. नागपूर विधानसभेतल्या निवेदनात त्यांनी ही माहिती दिली.
संत तुकाराम आणि संत ज्ञानेश्वर महाराज यांच्यापेक्षा मनू श्रेष्ठ होता असे वादग्रस्त वक्तव्य शिवप्रतिष्ठानच्या संभाजी भिडे यांनी अर्थात भिडेगुरूजींनी केले. या वक्तव्यामुळे चांगलाच वाद निर्माण झाला आहे. यासंदर्भात विरोधकांनी आवाज उठवल्यावर भिडे यांनी केलेल्या वक्तव्याची क्लिप तपासून बघू त्यात त्यांचे बोलणे असंवैधानिक आढळले तर प्रसंगी त्यांच्यावर कारवाईही करू
विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही संभाजी भिडेंवर सरकारने कारवाई का केली नाही असे प्रश्न अधिवेशना दरम्यान उपस्थित केले. या प्रश्नांना उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी संभाजी भिडे नेमके काय म्हटले ते ऐकू ते दोषी आढळले तर त्यांना शिक्षा होईल असे आश्वासन दिले आहे.