निर्भीडसत्ता न्यूज –
पिंपरी-चिंचवड शहरात पावसाळ्यात खड्डे बुजविण्यासाठी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने या वर्षी जेट पॅचर मशीनचा वापर सुरू केला. या कंत्राटामध्ये एक खड्डा बुजविण्यासाठी जवळपास १८ हजार रुपयांचा खर्च येत असल्याची बाब पुढे आली. त्यानंतर आरोप व या कामाच्या चौकशीची मागणी होत असताना भाजपचे शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप यांनी त्याची दखल घेतली आहे. त्यांनी या मशीनने खड्डे बुजविण्यात ऐवढा खर्च येत असल्यास त्याचा वापर फक्त पावसात करण्याची सूचना आयुक्तांना केली आहे,
या संपूर्ण प्रकरणाची चर्चा शहरात होत आहे. या चर्चेनंतर आमदार लक्ष्मण जगताप यांनी महानगरपालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना पत्र दिले आहे. जगताप यांनी त्यात म्हटले आहे की, पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने जेट पॅचर पोथॉल पॅचिंग मशीनचा पावसाळ्यातील खड्डे बुजवण्यासाठी उपयोग करण्यात येत आहे, असे समजते.
याकरिता १ चौरस मीटरचा खड्डा बुजवण्याकरिता अठरा हजार रु. एवढा खर्च येणार आहे, असे समजते. तरी जेट पॅचर पोथॉल पॅचिंग मशीनचा उपयोग हा फक्त पाऊस चालू असतानाच खड्डे बुजवण्याकरिता करण्यात यावा. अन्यथा पाऊस नसताना खड्डे बुजवण्याकरिता “जेट पॅचर’’ मशीनचा उपयोग न करता नेहमीच्या प्रणालीचा उपयोग करण्यात यावा, असे जगताप यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे.