स्मार्ट सिटीत पिंपळे सौदागर, वाकड, पिंपळे गुरव बीआरटीएस मार्गावर सायकल स्टेशन
निर्भीडसत्ता न्यूज –
पिंपरी-चिंचवड शहराच्या स्मार्ट सिटीत पिंपळे सौदागर, वाकड व पिंपळे गुरव येथील बीआरटीएस मार्गावरील 45 ठिकाणी (सार्वजनिक सायकल सुविधा) ‘पब्लिक बायसिकल शेअरींग’ योजना उपक्रम 15 ऑगस्टपासून सुरू करण्यात येणार आहे. महापालिका व स्मार्ट सिटी कंपनी कोणतीही आर्थिक गुंतवणूक करणार नाही. संबंधित प्रायोजक सायकल कंपन्या त्याचे नियोजन, नियंत्रण व देखरेख करणार आहे.
स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी व आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्यासोबत 3 जुलैला बैठक झाली. त्यात या योजनेसंदर्भात अटी व शर्ती निश्चित करण्यात आल्या आहेत. पुणे स्मार्ट सिटी लिमिटेडच्या धर्तीवर ही योजना प्रायोजक तत्वावर शहरात राबविली जाणार आहे. पालिका किंवा स्मार्ट सिटी त्यासाठी कोणतीही आर्थिक गुंतवणूक करणार नाही. पालिका केवळ जागा उपलब्ध करून देणार आहे.
पहिल्या टप्प्यात पिंपळे सौदागर, वाकड व पिंपळे गुरवमधील बीआरटीएस मार्गावर आणि एरिया बेस डेव्हल्पमेंट भागांतील एकूण 45 ठिकाणी लागू करण्यात येणार आहे. प्रतिसाद लक्षात घेऊन या योजनेचा विस्तार केला जाणार आहे. इच्छुक प्रायोजक कंपन्यांशी करार करण्यास मान्यता देण्याचा विषय बुधवारी (दि.1) होणार्या स्थायी समिती सभेपुढे मंजुरीसाठी ठेवण्यात आला आहे.