राष्ट्रध्वज अवमान प्रकरणी मुख्यमंत्री फडणवीस, आयुक्त हर्डीकर आणि ‘आपले सरकार’ या राज्य शासनाच्या पोर्टलवर तक्रार, काळभोर यांचा आंदोलनाचा इशारा
निर्भीडसत्ता न्यूज –
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने निगडीतील भक्ती-शक्ती समुह शिल्प उद्यानात मोठा थाटात 107 मीटर उंचीचा राष्ट्रध्वज उभा करण्यात आला आहे. मात्र, तेथील राष्ट्रध्वज अनेकदा शिलाई उसवल्याने फाटला. तसेच, गेल्या साडेतीन महिन्यांपासून स्तंभ ध्वजाविना आहे. या प्रकरणी पालिका प्रशासनावर राष्ट्रध्वजाचा अवमान केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची मागणी निगडीतील सामाजिक कार्यकर्ते सचिन काळभोर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.
महापालिकेच्या वतीने देशातील सर्वांत उंच 107 मीटर उंचीचा ध्वजस्तंभ 26 जानेवारी 2018 ला बसविण्यात आला. त्यासाठी तब्बल साडेतीन कोटी रूपये खर्च करण्यात आले. त्यानिमित्त भव्य कार्यक्रमाचे आयोजन ही केले गेले. मात्र, वेगवान वार्यामुळे ध्वजाची शिलाई उसवून तो फाटला. काही वेळा तो अर्धवट खाली आला होता. त्यामुळे पालिकेने सदर ध्वज काढून ठेवला आहे. त्यास तब्बल साडेतीन महिन्यांचा कालावधी झाला आहे. त्यामुळे या परिसरात आलेल्या नागरिकांचा हिरमोड होत आहे. जगद्गगुरू संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांची आषाढी वारी या चौकातूनच मार्गस्थ झाली. त्या वेळेही स्तंभावर ध्वज नसल्याने वारकर्यांनी आणि भाविकांनी नाराजी व्यक्त केली होती.
स्तंभावर ध्वज नसल्याने राष्ट्रध्वजाचा अवमान होत आहे. या प्रकरणी पोलिसांमध्ये गुन्हा नोंदविण्याची मागणी त्यांनी मुख्यमंत्री फडणवीस, पालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर आणि ‘आपले सरकार’ या राज्य शासनाच्या पोर्टलवर केली आहे. या संदर्भात 15 दिवसांच्या आत कारवाई न झाल्यास आंदोलनाचा इशारा काळभोर यांनी दिला आहे.