निर्भीडसत्ता न्यूज –
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी पुण्यातील चाकण येथे 30 जुलैला मराठा आंदोलकांनी वाहनांची तोडफोड व जाळपोळ केली होती. या झालेल्या हिंसाचार प्रकरणी पोलिसांनी धरपकड सुरु केली आहे. पोलिसांनी आतापर्यंत विविध ठिकाणांहून 20 जणांना ताब्यात घेतले आहे.
दरम्यान 100 हून अधिक आंदोलकांनी ओळख सीसीटीव्ही फुटेजवरून पटली असून त्यांना लवकरच अटक करण्यात येणार असल्याची माहिती पुणे जिल्हा ग्रामीण पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांनी दिली आहे. मात्र, सर्वांची नावे गोपनिय ठेवण्यात आली आहेत.
4 ते 5 हजार जणांवर गुन्हा
आंदोलनादरम्यान जाळपोळप्रकरणी पोलिसांनी 4 ते 5 हजार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जमाव जमवणे, दंगल घडवणे आणि पोलिसांवर हल्ला केल्याचा ठपका आंदोलकांवर ठेवला आहे. आंदोलनात समाजकंटकांचा शिरकाव झाल्याचाही संशय व्यक्त केला जात आहे. या हल्ल्यात काही पोलिसही जखमी झाले होते. आंदोलनात समाजकंटकांचा शिरकाव झाल्याचा संशय पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांनी व्यक्त केला होता.