निर्भीडसत्ता न्यूज –
बोपखेल ते खडकी असा मुळा नदीवर पुलासाठी संरक्षण विभागाने जागेच्या मोबदल्यात रक्कमेऐवजी जागेची मागणी केली आहे. सदर जागा पालिका नव्हे तर, राज्य शासनाकडून दिली जाणार आहे. त्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिका राज्य शासनाला निधी देणार आहे, असे पालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी सांगितले.
ते म्हणाले की, संरक्षण विभागास जागेच्या रक्कमेऐवजी जागा हवी आहे. जागा हस्तांतरणाचा पालिकेचा नियम नाही. त्यामुळे राज्य शासनाकडे पत्रव्यवहार करण्यात आला आहे. शासन संरक्षण विभागास जागा देत आहेत. त्यात बोपखेल पुलासाठी घेण्यात आलेली 16 हजार 122 वर्ग मीटर जागाही देण्याची विनंती करण्यात आली आहे. त्यास शासनाने सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. या जागेच्या बदल्यात पालिका शासनाला जागेच्या किंमतीनुसार निधी अदा करणार आहे.
सदर पुलासंदर्भात संरक्षण विभागाने सुरक्षेच्या दृष्टीने काही सूचना केल्या आहेत. त्यानुसार पुल उभारणीत दक्षता घेण्यात येणार आहे. पुलाभोवती संरक्षण भिंत, संरक्षण विभागासाठी वॉच टॉवर आणि टँक (रणगाडा) जाणार्या रस्त्यावरून दुचाकी व पादचार्यांसाठी पुल बांधण्यात येणार आहे. पिंपळे निलख येथे संरक्षण विभागासाठी जसा पुल बांधून दिला आहे. त्यापद्धतीने त्यांना ये-जा करण्यास सोईस्कर होईल असा दुचाकी वाहनांसाठी पुल असणार आहे. त्यासाठी 4 कोटी 26 लाख रूपये खर्च अपेक्षित आहे. तो विषय मंजुरीसाठी स्थायी समितीसमोर ठेवला आहे, असे त्यांनी सांगितले.