निर्भीडसत्ता न्यूज ।
शहरात गेल्या दोन वर्षांच्या तुलनेत यावर्षी स्वाइन फ्लूची लागण आणि त्यामुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण कमी झाले असल्याचे आकडेवारीवरून समोर आले आहे. गेल्या वर्षी 34 रुग्णांना स्वाइन फ्लूने आपला जीव गमवावा लागला होता. या वर्षी त्यामध्ये घट झाली असून जानेवारी महिन्यापासून तीन जणांचा स्वाइन फ्लूने मृत्यू झाला आहे.
2015 या वर्षी 526 रुग्णांना स्वाइन फ्लूची लागण झाली होती. त्यापैकी 64 रुग्णांना प्राण गमवावे लागले होते. त्यानंतर 2016 साली परिस्थिती नियंत्रणात आली होती. सात रुग्णांपैकी 2 रुग्णांचा मृत्यू झाला होता. मात्र त्यानंतर 2017 मध्ये परिस्थिती पुन्हा नियंत्रणाबाहेर गेली. त्या वर्षी 413 रुग्णांपैकी 61 रुग्ण दगावले. 2018 या वर्षामध्ये 243 रुग्णांना स्वाइन फ्लूची लागण होऊन 34 जणांचा मृत्यू झाला. त्यानंतर यावर्षी म्हणजेच जानेवारी ते नोव्हेंबर 2019 या अकरा महिन्यामध्ये परिस्थिती नियंत्रणात आली. या वर्षी 19 रुग्णांना स्वाइन फ्लूची लागण झाली. त्यापैकी 3 रुग्णांचा मृत्यू झाला.
मागील काही वर्षामध्ये शहरामध्ये स्वाइन फ्लूच्या रुग्णांची संख्या शेकडोच्या घरात होती. मागील वर्षी यातील मृतांचे प्रमाणही लक्षणीय होते. मात्र या वर्षी स्वाइन फ्लूमुळे मृत्यू पडणाऱ्यांची संख्या घटल्याचे सकारात्मक चित्र आहे. मागील वर्षीपेक्षा यंदाच्या वर्षात स्वाइन फ्लूमुळे मृत्यूमुखी पडणाऱ्या रुग्णांची संख्या घटली आहे. 2018 या वर्षी पावसाळा आणि हिवाळ्यातही स्वाइन फ्लूच्या रुग्णांची संख्या लक्षणीय होती.
यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेने ठोस पाऊले उचलत जनजागृतीची मोहीम हाती घेतली. तसेच ज्येष्ठ नागरिक व गरोदर महिलांसाठी लसीकऱण मोहीम राबविण्यात आली. महापालिकेने केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत नागरिकांनी स्वाइन फ्लूला रोखण्यासाठी प्रयत्न केले. त्यामुळे या वर्षी पावसाळ्यामध्ये स्वाइन फ्लूचा एकही रुग्ण आढळला नाही.
स्वाइन फ्लूची लक्षणे
ताप घसा खवखवणे थकवा अंगदुखी अतिसार, उलटी श्वसनाचा त्रास अंगावर पुरळ येणे
अशी करा प्रतिबंधात्मक उपाययोजना
सार्वजनिक ठिकाणी जाणे टाळा
खोकताना किंवा शिंकताना रुमालाचा वापर करा
मास्कचा वापर करा
बाहेरून आल्यावर तोंड, हात-पाय स्वच्छ धुवा
भरपूर पाणी प्या