निर्भीडसत्ता न्यूज ।
पिंपरी-चिंचवड महापालिकेचे नेहरूनगर, पिंपरी येथील अण्णासाहेब मगर स्टेडियमचे बांधकाम पाडून टाकण्यात येणार आहे. हे काम खासगी एजन्सीकडून करून घेतले जाणार आहे. या कामासह संपूर्ण बांधकाम राडारोडा, दरवाजे खिडक्या, लोखंड या बदल्यात पालिकेस 81 लाख 92 हजार रूपयांचे उत्पन्न मिळणार आहे.
महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या वतीने नेहरूनगर येथे अण्णासाहेब मगर स्टेडिमय बांधण्यात आले होते. ते स्टेडिमय मंडळाने महापालिकेच्या ताब्यात 1992 ला दिले. या स्टेडिमयचे बांधकाम योग्य की धोकादायक आहे, या संदर्भात पालिकेने खासगी एजन्सीकडून स्टेडिमयचे ‘स्ट्रक्चरल ऑडिट’ केले होते. त्यात स्टेडिमयचे बांधकाम धोकादायक असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे येथील क्रीडा विभाग, महाराष्ट्र ऑलिम्पिक महासंघ, शूटींग रेज, भोसरी विधानसभा निवडणुक विभाग तसेच, विविध क्रीडा संघटनांचे कार्यालये येथून हलविण्यात आले आहेत. या स्टेडिमयच्या भोवती बांधकाम धोकादायक असल्याचा फलकही लावण्यात आला आहे.
हे बांधकाम पाडण्याचा निर्णय अखेर पालिका प्रशासनाने घेतला आहे. त्यासाठी प्रशासनाने ऐ टू झेड स्क्रॉपर्सची निवड केली आहे. त्या कामासाठी संबंधित एजन्सीने पालिकेच्या कोषागारात 81 लाख 92 हजार रूपयांचे निधी जमा केला आहे. स्टेडिमयचे बांधकाम पाडून, इमारतीमधून प्राप्त होणारा राडारोडा, स्ट्रक्चरल स्टील, लोखंड, दरवाजा, खिडक्या, काँक्रीट, विटा, फरशी, लोखंडी ग्रील, लोखंडी रेलींग, पत्रे, लाकूड, विद्युत वायरींग, बटणे आणि इतर न काढता येणारे साहित्य संबंधित एजन्सी घेणार आहे. या कामास मान्यता देण्याचा प्रस्ताव मंजुरीसाठी येत्या बुधवारी (दि.11) होणार्या स्थायी समिती सभेसमोर ठेवण्यात आला आहे.