केळघर | निर्भीडसत्ता न्यूज
जावळी तालुक्यातील केडंबे येथील 65 वर्षे वयाच्या वृद्धाच्या करोना चाचणीचा अहवाल (दि. 20) रात्री उशिरा पॉझिटिव्ह आल्याने घबराट पसरली आहे. प्रशासकीय अधिकाऱ्यांनी रविवारी गावाची पाहणी केली. खबरदारीचा उपाय म्हणून गावाच्या सीमा बंद करण्यात आल्या असून पोलीस बंदोबस्तही ठेवण्यात आला आहे.
नवी मुंबईतील कोपरखैरणे येथून 65 वर्षांचा वृद्ध, त्याची पत्नी व मुलासह सहा जण 11 जूनला खासगी वाहनाने केडंबे येथे आले. त्यातील 55 वर्षे वय असलेल्या महिलेला शुक्रवारी (दि. 19) सकाळपासून श्वसन व खोकल्याचा त्रास होऊ लागल्याने केडंबे येथील आशा स्वयंसेविका व आरोग्यसेवक अरविंद सोमवंशी यांनी त्या महिलेला व तिच्या पतीला केळघर येथे प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठवले. तेथे वैद्यकीय अधिकारी डॉ. साधना कवारे यांनी तपासणी करून त्यांना जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठवले होते. त्यातील 65 वर्षांच्या वृद्धाचा अहवाल काल रात्री उशिरा पॉझिटिव्ह आल्याने परिसरात भीतीचे वातावरण आहे.
तालुका आरोग्य अधिकारी डॉ. भगवान मोहिते, डॉ. साधना कवारे, आरोग्य सहाय्यक विशाल रेळेकर, सतीश मर्ढेकर, तलाठी मगरे, ग्रामसेवक अमोल गायकवाड, आरोग्यसेवक अरविंद सोमवंशी, रूपाली कदम, आशा स्वयंसेविका व अंगणवाडी सेविकांनी केडंबे येथे पाहणी करून बाधित व्यक्ती गावातील कुणाच्या संपर्कात आले आहे का, याची माहिती घेतली. बाधिताच्या प्रत्यक्ष संपर्कात आलेल्या पाच जणांच्या घशातील स्रावांचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात येणार आहेत. बाधिताच्या अप्रत्यक्ष संपर्कात आलेल्या चौघांना होम क्वारंटाइन करण्यात आले असून गाव प्रतिबंधित क्षेत्र घोषित करण्यात आले आहे. गावाच्या सीमा सील करून पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.