पिंपरी | निर्भीडसत्ता न्यूज
ग्रामीण भागातील गोरगरीब विद्यार्थ्यांना शालेय साहित्यांची मदत करण्यासाठी नवी सांगवी येथील दोन तरुणांनी मिळून “१ वही – १ उज्ज्वल भवितव्य” हा स्तुत्य उपक्रम सुरू केला आहे. हे दोघेही दानशूर नागरिकांकडून गोरगरीब विद्यार्थ्यांसाठी मदत म्हणून वही, पेन्सिल, खोडरबर, शार्पनर, पेन, रंगखडू बॉक्स, पट्टी किंवा इतर शालोपयोगी साहित्य गोळा करत आहेत. त्यानुसार सांगवीतील उद्योजक अमित पसरणीकर यांनी या दोन्ही तरूणांकडे २०० वह्यांची मदत दिली आहे. जमा झालेले हे शालेय साहित्य गोरगरीब विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविले जाते. तुम्ही सुद्धा गोरगरीब विद्यार्थ्यांना शालेय साहित्याची मदत करण्यासाठी पुढे या, असे आवाहन या दोन्ही तरूणांनी केले आहे.
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या पालकांची परिस्थिती हलाखीची असते. हे विद्यार्थी सरकारकडून मोफत मिळणाऱ्या शालेय साहित्यावरच आपले शिक्षण पूर्ण करत असतात. अनेक आर्थिक अडचणींना सामोरे जात हे विद्यार्थी शिक्षण घेत असतात. अशा विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी लागणारे किमान शालेय साहित्य तरी मिळावे या उद्देशाने नवी सांगवीतील अक्षय परदेशी आणि शुभम पाटील या दोन तरूणांनी “१ वही – १ उज्ज्वल भवितव्य” हा उपक्रम सुरू केला आहे.
या उपक्रमांतर्गत दानशूर नागरिकांनी त्यांच्या कुवतीप्रमाणे वही, पेन्सिल, खोडरबर, शार्पनर, पेन, रंगखडू बॉक्स, पट्टी तसेच इतर शालेय साहित्य गोळा केले जाते. हे साहित्य ग्रामीण भागातील गोरगरीब विद्यार्थ्यांपर्यंत पोहचविले जाते. या दोन तरुणांनी स्वतःच्या खर्चाने देखील अनेक गोरगरीब विद्यार्थ्यांना शालेय साहित्याची मदत केली आहे. समाजातील दानशूर नागरिकांनी देखील या उपक्रमात हातभार लावल्यास जास्तीत जास्त गोरगरीब विद्यार्थ्यांना शालेय साहित्याची मदत मिळेल, असे अक्षय परदेशी आणि शुभम पाटील या तरूणांनी सांगितले.
“१ वही – १ उज्ज्वल भवितव्य” या उपक्रमाला नवी सांगवीतील उद्योजक अमित पसरणीकर यांनी देखील मदतीचा हात दिला आहे. पसरणीकर यांनी २०० वह्यांची मदत अक्षय परदेशी आणि शुभम पाटील यांच्याकडे दिली आहे. यावेळी जवाहर ढोरे, धनंजय ढोरे, प्रशांत माटूर, रोहित रसाळ आदी उपस्थित होते. तुम्ही सुद्धा गोरगरीब विद्यार्थ्यांना शालेय साहित्याच्या मदतीसाठी हात पुढे करू शकता. कोणाला अशी मदत करायची असेल तर 8956560043 या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा.