पिंपरी | निर्भीडसत्ता न्यूज
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या अतिक्रमण निर्मुलन विभागाच्या कर्मचार्यांना बसण्यासाठी पालिका भवनात कोणत्याही व्यवस्था नसल्याने त्यांना ऊन, वारा, पाऊस असा वातावरणात उघड्यावर दिवसभर बसावे लागत आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या कर्मचार्यांनी महापालिका भवनाच्या प्रवेशद्वारावर शुक्रवारी (दि.10) ठिय्या आंदोलन करीत आपली नाराजी प्रशासनासमोर व्यक्त केली.
या विभागात पालिका आस्थापनेवरील 80 कर्मचारी, होमगार्ड, पोलिस तसेच, पीएमपीएलचे कर्मचार्यांचा समावेश आहे. तब्बल 200 ते 300 जण या विभागात आहेत. या सर्व कर्मचार्यांना पालिका भवनात बसण्यासाठी कोणतेही व्यवस्था नाही. त्यामुळे त्यांना ऊन, वारा, पाऊस असतानाही कोठेही उघड्यावर दिवस काढावा लागत आहे. बसण्यासाठी आणि जेवणासाठी जागा उपलब्ध नाही. या संदर्भात प्रशासनाकडे वारंवार पत्रव्यवहार करूनही हा प्रश्न आहे तसाच आहे.
तसेच, कोरोना महामारीत हातगाडी, फेरीवाले यांच्यामार्फत कोरोना विषाणूचा संसर्ग होऊ नये म्हणून कर्मचार्यांनी काम केले. त्यांना अतिरिक्त 50 टक्के मेहनताना देण्याची ग्वाही देऊन 3 महिने उलटूनही दिला गेलेला नाही. यासह विविध मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी संतप्त कर्मचार्यांनी शुक्रवारी पालिका भवनाच्या प्रवेशद्वारासमोर ठिय्या आंदोलन केले.