- तीन दिवसात योग्य खुलासा न केल्यास कारवाई करणार; पक्षनेते नामदेव ढाके यांचा इशारा
पिंपरी | निर्भीडसत्ता न्यूज
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या संत तुकारामनगर येथील यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रूग्णालयातील डॉक्टर व कर्मचार्यांना शिवीगाळ करून दमदाटी करणार्या भाजपचे नगरसेवक संदीप वाघेरे यांना भारतीय जनता पक्षाकडून शिस्तभंग केल्याची नोटीस मंगळवारी (दि.28) देण्यात आली आहे. या नोटीशीला 3 दिवसांत योग्य उत्तर न दिल्यास कडक कारवाई केली जाईल, असा इशाराा पिंपरी-चिंचवड महापालिकेचे सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके यांनी दिला आहे.
कोरोना महामारीच्या संकट काळात आणि आपत्तकालीन परिस्थितीमध्ये स्वत:च्या जीव धोक्यात घालून वायसीएम रूग्णालयात कोरोनाबाधित रूग्णांवर डॉक्टर दिवस-रात्र उपचार करीत आहेत. ते गेली 4 महिन्यांपासून कुटुंबापूसन दूर आहेत. अशा रूग्णसेवा करणार्या डॉक्टरांना शिवीगाळ व दमदाटी करण्याचा प्रकार निंदनीय आहे. या गैरवर्तनामुळे भाजप पक्ष शिस्तीला तडा गेला आहे. पक्षाच्या नगरसेवकांना काही अडचण किंवा तक्रार असल्यास त्यांनी प्रथम पक्षनेत्यास किंवा शहराध्यक्षांना कळविणे पाहिजे. त्यानंतर त्यांनी पुढील पाऊल उचलले पाहिजे, असे नामदेव ढाके म्हणाले.
परस्पर या प्रकारे गैरकृत्य करणे हे बेशिस्तीचे लक्षण आहे. असे गैरवर्तन भाजप खपवून घेणार नाही. त्यामुळे नगरसेवक संदीप वाघेरे यांना मंगळवारी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. त्यांनी येत्या 3 दिवसांत या नोटीशीला योग्य उत्तर न दिसल्यास कारवाई केली जाईल, असे नामदेव ढाके यांनी स्पष्ट केले. या पुढे पक्षविरोधी व पक्षाची शिस्तभंग केल्यास त्या नगरसेवकांवर कडक कारवाई केली जाईल, असे त्यांनी सांगितले.