पिंपरी |निर्भीडसत्ता न्यूज
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने मास्क न वापरणार्यांवर आणि रस्त्यावर थुंकणार्यांवर कारवाई केली जात आहे. आता, सोशल डिस्टन्सिंगचे पालन न करणार्या व्यक्तींवर ही कारवाई केली जाणार आहे. त्यासाठी पालिका प्रशासन माजी सैनिकांचे विशेष पथक नेमणार आहे.
नाक व तोंडावर योग्य पद्धतीने मास्क लावल्यास कोरोना विषाणूचा प्रसार होत नाही. त्यामुळे पालिकेने मास्क लावणे नागरिकांना बंधनकारक केले आहे. मास्क नसणार्यांना 500 रूपये दंड केला जात आहे. ही कारवाई 1 एप्रिलपासून सुरू करण्यात आली आहे. 31 जुलैपर्यंत 4 महिन्यांत एकूण 2 हजार 850 जणांना कारवाई करीत एकूण 14 लाख 25 हजार रूपयांचा दंड वसुल करण्यात आला आहे. तर, रस्त्यावर थुंकणार्या 4 हजार 550 इतका जणांवर 150 रूपये दंड केला असून, ही 6 लाख 82 हजार 500 इतकी रक्कम आहे. या दोन्ही कारवाईत एकूण 21 लाख 7 हजार 500 दंड पालिकेच्या तिजोरीत जमा झाला आहे.
तसेच, कोरोनाचा संसर्ग होऊ नये म्हणून सोशल डिस्टन्सिंगचे पालन करण्याचे आवाहन पालिका प्रशासन सतत करीत आहे. दोन व्यक्तींमध्ये 6 फुटांचे अंतर ठेवणे आवश्यक आहे. मात्र, बाजारपेठ, मंडई, दुकाने व सार्वजनिक ठिकाणी सोशल डिस्टन्सिंगचे पालन केले जात नसल्याचे चित्र आहे. त्या संदर्भात तक्रारींही वाढल्या आहेत. त्यामुळे पालिकेने माजी सैनिकांचे एक पथक त्यासाठी तैनात करणार आहे. त्या पथकाद्वारे कारवाई केली जाणार आहे.
पालिकेच्या आरोग्य विभागाच्या पथकाद्वारे मास्क न लावणार्या व रस्त्यावर थुंकणार्यांवर नियमितपणे कारवाई केली जात आहे. मास्क न लावल्याचे दुसर्यांदा आढळल्यास 500 ऐवजी 1 हजार रूपये दंड केला जात आहे. तसेच, नियमभंग करणार्यांवर पोसिलांकडूनही मोठ्या प्रमाणात कारवाई सुरू आहे. सोशल डिस्टन्सिंगचे पालन न करणार्या व्यक्तींवर कारवाईसाठी आता माजी सैनिकांचे विशेष पथक नियुक्त केले जाणार आहे, असे आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी सांगितले. प्रत्येक नागरिकांनी घराबाहेर पडल्यास तोंडावर योग्यरितीने मास्क लावावा. घरात अधिक सदस्य असतील तर, सर्वांनी मास्कने गरजेचे आहे, असे आवाहनही त्यांनी केले आहे.