मुंबई : भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी अखेर भाजपच्या सदस्यपदाचा राजीनामा दिला आहे. त्यांच्यासह अनेक आमदार आणि नेते राष्ट्रवादीत येण्यास तयार आहे, अशी माहिती राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिली आहे. गेल्या काही दिवसांपासून भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे राष्ट्रवादीत प्रवेश करणार अशी चर्चा रंगली आहे. अखेर या चर्चांना जयंत पाटील यांनी पूर्णविराम दिला आहे.
‘एकनाथ खडसे यांचं आम्ही पक्षात स्वागत करत आहोत. शुक्रवारी दुपारी २ वाजता त्यांचा पक्षात प्रवेश होईल’, अशी घोषणाच जयंत पाटील यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेऊन केली आहे.‘ एकनाथ खडसे हे भारतीय जनता पक्षाचे गेले तीन ते साडेतीन दशक नेतृत्व करणारे नेते आहे, त्यांनी गोपीनाथ मुंडे यांच्यासोबत अनेक वर्ष काम केलं आहे. त्यांच्यावर पक्षात अन्याय झाला आहे, त्यामुळे ते राष्ट्रवादीत प्रवेश करत आहे. त्यांच्या प्रवेशाची बातमी ही आमच्यासाठी सुखद आहे, असंही जयंत पाटील म्हणाले.
‘एकनाथ खडसे यांच्यासोबत अनेक नेत्यांना येण्याची इच्छा आहे. अनेक आमदार त्यांच्या संपर्कात आहे. पण कोरोनाची परिस्थिती असल्यामुळे निवडणुकात सध्या परवडणार नाही. त्यामुळे टप्प्याने त्यांना प्रवेश दिला जाणार आहे, असंही खडसेंनी सांगितले.‘एकनाथ खडसे यांचा शुक्रवारी प्रवेश होत आहे. त्यानंतर त्यांना काय जबाबदारी दिली जाणार हे नंतर ठरणार आहे, असं ही पाटील यांनी सांगितले.एकनाथ खडसे यांच्यावर भाजपमध्ये अन्याय झाला आहे. हे आम्हीच नाहीतर भाजपचे नेते सुद्धा खासगीत बोलत असतात. त्यामुळे त्यांनी भाजपच्या पक्षबांधणीसाठी मोलाचे काम केले आहे. त्यांच्यावर अन्याय होत असल्यामुळे त्यांनी हा निर्णय घेतला आहे, असंही पाटील म्हणाले.