पिंपरी | निर्भीडसत्ता न्यूज
पिंपरी-चिंचवड महापालिकेचे संत तुकारामनगर येथील यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रूग्णालय नॉनकोविड (पूर्वीप्रमाणे सर्व आजारावर उपचार) करण्याचे नियोजन पालिका प्रशासनाने सुरू केले आहे. त्यासाठी कोरोनाबाधित रूग्ण संख्येची चाचपणी केली जात आहे.
शहरात 11 मार्चला कोरोनाचे पहिले 3 रूग्ण आढळून आले. या रूग्णांवर उपचार करण्यासाठी पालिकेने वायसीएम रूग्णालय कोरोना सर्मपित केले. त्यास मार्चच्या अखेरीस सुरूवात करण्यात आली. एकूण 750 बेड क्षमतेच्या या रूग्णालयात केवळ कोरोनावर उपचार केले जात आहेत. इतर आजारांच्या रूग्णांवर शेजारच्या डॉ. डी. वाय. पाटील रूग्णालयात पालिकेच्या दरात उपचार केले जात आहेत. त्यासाठी पालिकेने 3 एप्रिलला करार केला होता.
शहरातील कोरोनाबाधित रूग्ण संख्या झपाट्याने कमी झाली आहे. आता दररोज केवळ 200 ते 300 पॉझिटिव्ह रूग्ण आढळत आहे. त्यातील बहुतांश रूग्ण घरी राहून उपचार घेणे पसंत करीत आहेत. त्यामुळे पालिकेच्या वायसीएम, भोसरी, जिजामाता व ऑटो क्लस्टर रूग्णालयातील रूग्ण संख्या खूपच घटली आहे. तसेच, नेहरूनगरच्या जम्बो रूग्णालयातही अर्ध्यापेक्षा अधिक बेड रिकामे आहेत.
रूग्ण संख्या घटल्याने म्हाळुंगे-बालेवाडी क्रीडानगरी, चिखलीतील घरकुल व भोसरीतील बालनगरी येथील कोविड केअर सेंटर सुरू आहे. तेथे एकूण 700 बेडची सुविधा उपलब्ध आहे. प्रतिसाद कमी असल्याने क्रीडानगरीचे सेंटरही बंद करण्याचा प्रशासन विचार करीत आहे. तसेच, वायसीएम रूग्णालयात पूर्वीप्रमाणे इतर आजारावर उपचार सेवा सुरू करण्याचे नियोजन प्रशासनाने केले आहे. त्यामुळे खासगी रूग्णालयासोबत केलेला करार संपुष्टात आणला जाणार आहे.
काही आठवडे कोरोना रूग्ण संख्येचा आढावा घेऊन कार्यवाही केली जाणार आहे. त्यामुळे इतर आजारग्रस्त रूग्णांवर पूर्वीप्रमाणे वायसीएममध्ये उपचार मिळू शकणार आहेत. दरम्यान, स्थायी समितीने आयुक्तांना त्याबाबत पूर्वीच सूचना दिल्या आहेत. तसेच, शहरातील विविध संघटना व संस्थांनी वायसीएम रूग्णालय नॉनकोविड करण्याची मागणी वारंवार केली आहे. शहरातील कोरोनाबाधित रूग्णांसाठी भोसरी, जिजामाता व ऑटो क्लस्टर रूग्णालय कायम ठेवले जाणार आहे. हिवाळ्यात संसर्ग वाढून रूग्ण संख्या वाढल्यास उपचारासाठी अचडणी निर्माण होऊ नये म्हणून खरबरदारी घेण्यात येत आहे.
पिंपरी-चिंचवड शहरातील कोरोनाबाधित रूग्ण संख्या घटत आहे. त्यामुळे पालिकेने 21 पैकी 18 कोविड केअर सेंटर बंद केले आहेत. प्रतिसाद कमी असल्याने म्हाळुंगे-बालेवाडी येथील सेंटरही बंद करण्याचा विचार आहे. त्याचप्रमाणे वायसीएम रूग्णालयात पूर्वीप्रमाणे नॉनकोविड म्हणजे सर्व आजारांच्या उपचारासाठी सुरू करण्याचे नियोजन केले जात आहे. शहराची रूग्ण संख्या लक्षात घेऊन ही कार्यवाही केली जात आहे, असे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त अजित पवार यांनी सांगितले.