पिंपरी | निर्भीडसत्ता न्यूज
इंदापूर येथे सुरू असलेल्या महाराष्ट्र राज्य प्रौढ अॅथलेटिक्स स्पर्धेत पिंपरी-चिंचवड व पुणे शहरातील खेळाडूंनी यशस्वी कामगिरी करीत पदकांची लयलूट केली. वेगवान धावपटू जिग्नेश पटेल याने 4 सुवर्णपदक व खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या सचिन शिराळे याने तीन सुवर्णपदकांची कमाई केली. विजेत्यांची हेदराबाद येथे होणार्या राष्ट्रीय प्रौढ स्पर्धेसाठी महाराष्ट्र राज्य संघात निवड झाली आहे.
स्पर्धेत पुण्यातील जिग्नेश पटेल यांनी 100 मीटर धावणे, लांब उडी, उंच उडी व 4 बाय 100 मीटर रिले या प्रकारात प्रथम क्रमांक मिळविला. खडकी कॅन्टोन्मेंटच्या सचिन शिराळे याने 10,000 मीटर धावणे, 5,000 मीटर चालणे व 3,000 मीटर स्टीपलचेस प्रकारात प्रथम स्थान मिळविले.गणेश गोंडे याने लांब उडी, उंच उडी, 4 बाय 100मीटर रिले प्रकारात प्रथम क्रमांक मिळविला. तुलशिदास कोर्हाळेने 200 मीटर धावणे, लांब उडी, तिहेरी उडी, 4 बाय100 रिले प्रकारात सुवर्णपदक जिंकले. स्मिता सकपाळ हिने 800 धावणे प्रकारात प्रथम क्रमांक मिळविला.
भगवान वाघमारे याने 400 मीटर व 800 मीटर धावणेत तिसरा क्रमांक आणि 4 बाय 100 मीटर रिले प्रकारात दुसरा क्रमांक मिळविला. सचिन नाडे याने गोळा फेक व 4 बाय 100 मीटर रिले प्रकारात दुसरा क्रमांक तर, थाळी फेकीत तिसरा क्रमांक मिळविला. विजेत्यांची हेदराबाद येथे होणार्या राष्ट्रीय प्रौढ अॅथलेटिक्स स्पर्धेसाठी राज्य संघात निवड झाली.