पिंपरी | निर्भीडसत्ता न्यूज
पिंपरी-चिंचवड शहरातील ऑनसाईट कंपोस्टींग यंत्रणा, एसटीपी कार्यान्वीत आणि झिरो वेस्ट राबविणाऱ्या 5 हजार 991 पर्यावरण पूरक मालमत्ता धारकांनी ऑनलाइन नोंदणी केली आहे. या मालमत्तांसाठी सामान्य करात विविध कर सवलत देण्यात येत आहे. त्यामुळे या मालमत्ता धारकांना वर्षभरात तब्बल 32 लाख रुपयांची भरघोस अशी सवलत मिळणार आहे. 3 हजार 349 पर्यावरण पूरक मालमत्ता धारकांनी 30 जूनअखेर 4 कोटी 5 लाख रुपयांचा कर महापालिका तिजोरीत जमा केला आहे, याबाबतची माहिती कर संकलन व कर आकारणी विभागाचे सहाय्यक आयुक्त नीलेश देशमुख यांनी दिली.
पिंपरी-चिंचवड शहरात 5 लाख 78 हजार मालमत्तांची नोंद आहे. आतापर्यंत सुमारे दोन लाख मालमत्ता धारकांनी 260 कोटी रुपयांचा कर महापालिका तिजोरीत जमा केला आहे. शहरातील 24 सोसायट्यांसह 107 जणांनी पर्यावरण पूरक सोसायटी आणि बंगला असल्याबाबत महापालिकेच्या संकेतस्थळावर ऑनलाइन नोंदणी केली आहे. यामध्ये 5 हजार 991 फ्लॅट आणि बंगले आहेत. या सर्व पर्यावरण पूरक मालमत्ता धारकांना तब्बल 32 लाख रुपयांची सवलत मिळणार आहे. फेब्रुवारी 2022 पासून शहरातील 6 हजार पर्यावरण पूरक सोसायट्यांची नोंदणी केली आहे. पर्यावरण पूरक सोसायट्यांसाठी वर्षभर सवलत योजना उपलब्ध आहे. या योजनेचा जास्तीत- जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा. सोसाट्या पर्यावरण पूरक कराव्यात, असे सहायक आयुक्त नीलेश देशमुख यांनी सांगितले.