पिंपरी | निर्भीडसत्ता न्यूज
पिंपरी-चिंचवड महापालिका आणि पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटी लिमिटेडच्या वतीने व्हॉट्सअॅप आणि वेब चॅटबॉट प्रणाली सुरू करण्यात आली आहे. त्यावर नागरिकांना विविध विभागासंदर्भातील तक्रारी करता येणार आहेत. त्या सुविधा प्रणालीची सुरूवात आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांच्या हस्ते नुकतीच करण्यात आली.
सद्यस्थितीत मोबाईल व टेक्नॉलॉजीमध्ये झालेल्या बदलांचा विचार करून पालिकेद्वारे व्हॉट्सअॅप चॅटबॉट सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे. मिळकतकर, पाणीपुरवठा, बांधकाम परवानगी, समाज विकास, नगररचना आदी विविध 23 विभागांचा समावेश चॅटबॉट प्रणालीमध्ये करण्यात आला आहे.
चॅटबॉट ही एक संगणक प्रणाली असून, त्या माध्यमातून नागरिकांच्या लिखित व बोललेल्या संवादाचे विश्लेषण करण्यात येते. नागरिकांना प्रत्यक्ष मनुष्याशी संवाद साधल्यानंतर ज्या पद्धतीने उत्तर मिळते त्याच पद्धतीने सदर संगणक प्रणालीद्वारे उत्तर मिळते. चॅटबॉट विंडो पालिकेच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. या सुविधेचा नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन पालिकेने केले आहे.